खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला आली जाग
By Admin | Updated: July 20, 2016 00:22 IST2016-07-20T00:22:03+5:302016-07-20T00:22:03+5:30
पावसामुळे शहर व उपनगरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी व अपघातही वाढल्याने अखेर महापालिकेला जाग आली आहे.

खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला आली जाग
पुणे : पावसामुळे शहर व उपनगरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी व अपघातही वाढल्याने अखेर महापालिकेला जाग आली आहे. पावसाळा आला की खड्डे पडण्याची समस्या वारंवार उद्भवत आहे. त्यावर मात करण्यासाठी रस्त्यांची बांधणी, त्याची पद्धत, आयुर्मान, दुरवस्थेला जबाबदार घटक आणि नव्याने रस्तेबांधणीसाठी आवश्यक बाबी यांचा अभ्यास करून शहरात दर्जेदार रस्ते बांधणी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याची मागणी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी सेंट्रल रोड अॅन्ड रिसर्च इन्टिट्यूटचे (सीआरआरआय) संचालक डॉ. सतीश चंद्रा यांच्याकडे केली आहे.
शहरांमध्ये केवळ आठ दिवसच झालेल्या पावसाने अनेक रस्त्यांवर खड्डे पडण्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. मागील वर्षी बांधण्यात आलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडण्याचे प्रकार घडले आहेत. रस्त्यांच्या या दुरवस्थेची कारणे जाणून घेऊन त्याबाबत तांत्रिक सल्ला देण्याची विनंती सीआरआरआयकडे करण्यात आली आहे. त्याकरिता शहरातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी त्यांच्या पथकाला पुणे शहरामध्ये आमंत्रितही करण्यात आले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार शहराच्या रस्तेबांधणीचे धोरण निश्चित करण्यात येणार आहे.
पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेचा सातत्याने सामना करावा लागत आहे. खड्डे बुजविण्यावर पालिकेला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आहे. रस्त्यांच्या बांधणीमध्ये त्रुटी असल्यानेच रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब टाळण्यासाठी चांगले रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात, याची माहिती सीआरआयआयकडून मागविण्यात आली आहे. रस्ते खराब होत वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
>रस्तेबांधणीसाठी मागितले मार्गदर्शन
रस्त्याची रचना (आराखडा ) करणे
रस्ते बांधणीचे साहित्य आणि त्याचा दर्जा कसा असावा
रस्त्यासाठीचे साहित्य आणि रस्ता बांधणीदरम्यानची तपासणी प्रक्रिया कशी असावी
रस्ते बांधण्याची पद्धत कशी असावी