केंद्रात निजामाच्या बापाचे राज्य!
By Admin | Updated: June 9, 2016 06:34 IST2016-06-09T06:34:30+5:302016-06-09T06:34:30+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून देशभर डांगोरा पिटला जात आहे

केंद्रात निजामाच्या बापाचे राज्य!
औरंगाबाद : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून देशभर डांगोरा पिटला जात आहे. शेतकरी मरत असताना कसलं सेलिब्रेशन करत आहात, असा सवाल करत केंद्रात तर निजामाच्या बापाचं सरकार आहे, अशी कडवट टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. शिवसेनेची ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली असून ‘इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण औरंगजेबासारखे वागत आहात का, याचे आत्मपरिक्षण करा’ असा टोला सेनेला लगावला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्र मात बोलताना खा. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौ-यावरही टीका केली. ते म्हणाले, दिल्लीत पंतप्रधान आहेत का? अशी चौकशी केली तर उत्तर मिळते, ते लंडन, फ्रान्स, इराण, जर्मनीत आहेत. मोदींच्या भाषणातील मित्रों....मित्रों...या शब्दाचीही त्यांनी खिल्ली उडवली. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत, जो शिवसेनेच्या वाटेला गेला तो आडवा झाला किंवा तुरुंगात गेला, असे राऊत म्हणाले.
दरम्यान, इतरांना निजाम म्हणण्यापेक्षा आपण स्वत: औरंगजेबासारखे वागत आहोत का, याचे शिवसेनेने आत्मपरीक्षण करावे, असा प्रतिटोला भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांनी लगावला. केंद्रात आणि राज्यात आपणदेखील लाल दिव्याच्या गाडीत बसतो, हे शिवसेनेने ध्यानात ठेवावे. मात्र, सेनेचे सध्याचे वागणे दुटप्पी आहे, असे कदम म्हणाले. (प्रतिनिधी)