नितेश राणेंनी केले गुजरातींना लक्ष्य
By Admin | Updated: November 7, 2014 04:58 IST2014-11-07T04:58:49+5:302014-11-07T04:58:49+5:30
काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठीद्वेषी गुजरातींना लक्ष्य केले असून त्यांना महाराष्ट्रातून थेट हाकलून देण्याचे वक्तव्य केले आहे़

नितेश राणेंनी केले गुजरातींना लक्ष्य
मुंबई : काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठीद्वेषी गुजरातींना लक्ष्य केले असून त्यांना महाराष्ट्रातून थेट हाकलून देण्याचे वक्तव्य केले आहे़
टिष्ट्वटरवरून राणे यांनी हे वक्तव्य केले आहे़ ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचा नेहमीच विपर्यास केला जातो़ पण गुजराती मराठी माणसाबाबत करत असलेल्या टीकेकडे कोणीच लक्ष देत नाही़ स्वच्छ भारत अभियानाद्वारे आता या महाराष्ट्रद्वेषी गुजरात्यांना येथून हद्दपार करा आणि याची सुरुवात मुंबईतून करायला हवी़ तसेच आम्ही गुजरातींना थेट सांगितले आहे की, तुम्ही जर आमच्याबद्दल बोलत राहाल तर आम्हालाही साफसफाईसाठी उतरावे लागेल आणि यामध्ये चुकीचे काही नाही. मुळात आपण त्या विशिष्ट गुजराती लोकांना विचारले पाहिजे की, आमच्या मराठी लोकांबाबत अशी भूमिका का मांडता. महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे. इथे आम्ही आमच्या पद्धतीने राहणार, असेही राणे यांनी सांगितले़ कशा पद्धतीने साफसफाई करणार याबाबत विचारले असता राणे म्हणाले, सर्व गोष्टी आधीच सांगता येणार नाहीत़ टप्प्याटप्प्याने ते जाहीर करीऩ आम्ही मांसाहारी आहोत म्हणून आम्हाला घरे नाकारली गेली तर आम्हाला सोसायटीतील घराघरात जाऊन सुके मासे टाकावे लागतील, असा धमकीवजा इशाराही राणे यांनी दिला.
मराठी माणसासोबत अनेक गुजराती बांधव राहतात़ मात्र काही विशिष्ट गुजराती लोक आम्हाला अशा पद्धतीने हीन का लेखत आहेत, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला़ (प्रतिनिधी)