औरंगजेबच्या कबरीविरोधात सुरु झालेल्या आंदोलनांमुळे नागपुरात एक अफवा पसरली आणि त्याचे रुपांतर दंगलीत झाले. दंगलखोरांनी पोलिसांवरही हल्ले केले. अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तलवारी, लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत दहशत पसरविण्यात आली. हा प्रकार मुख्यमंत्री, गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे सगळीकडे हाय अलर्ट देण्यात आला असून विरोधक कडव्या हिंदुत्वावर वक्तव्ये करणाऱ्या नितेश राणेंवर टीका करत आहेत. अशातच नितेश राणेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नितेश राणे यांनी मुख्यंत्र्यांच्या दालनात जात त्यांची भेट घेतली. काही वेळानंतर ते बाहेर आले. नितेश राणेंनी केलेली एका समाजाविरोधातील भडक वक्तव्यांना विरोधक जबाबदार धरत आहेत. या मंत्र्याने राज्यातील वातावरण बिघडविले असल्याचा आरोप काँग्रेस, ठाकरे गटाचे नेते करत आहेत. यामुळे फडणवीसांनी राणेंना समज दिली असल्याची चर्चा सुरु आहे. अशातच प्रसारमाध्यमांनी नितेश राणेंना विचारले असता त्यांनी रागात प्रतिक्रिया दिली आहे.
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे. या दंगलखोरांना त्यांचा 'पाकिस्तानातील अब्बा' आठवेल अशी कारवाई केली जाणार आहे. असा प्रकार घडल्यानंतर आमचं देवाभाऊंचं सरकार गप्प बसेल, असे तुम्हाला वाटते का? असा सवाल राणे यांनी केला. तसेच मी मुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. फडणविसांनी हस्तांदोलन करत हसत माझे स्वागत केले. मुख्यमंत्री माझ्यावर काय बोलतात, याची चिंता तुम्ही करु नका. मी तुमच्या घरात डोकावतो का? असा सवाल त्यांनी पत्रकारांना केला.
तसेच नागपूर हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई होणार आहे. नागपुरात काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या आहेत. या राज्यात पूर्वीसारखे काही घडवणे सोपे राहिलेले नाही. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलीस गेले होते, त्यांच्यावरच हल्ले करण्यात आले. हे कुठल्या चौकटीत बसणारे आंदोलन आहे, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, ही हिंमत तोडण्याचे काम केले जाणार आहे, असा इशारा राणे यांनी दिला.