नदीत निर्माल्य टाकण्यास बंदी!
By Admin | Updated: July 4, 2014 06:08 IST2014-07-04T06:08:27+5:302014-07-04T06:08:27+5:30
महाराष्ट्रातील नद्यांमध्ये गाडी धुणे, घाण व निर्माल्य टाकणे यावर उच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत़

नदीत निर्माल्य टाकण्यास बंदी!
मुंबई : महाराष्ट्रातील नद्यांमध्ये गाडी धुणे, घाण व निर्माल्य टाकणे यावर उच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत़ तसेच असे करणाऱ्यांवर थेट गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने सर्व नगरपालिका व नगर परिषदांना दिले आहेत़
निर्माल्य टाकण्यासाठी नदीकाठावर निर्माल्य कलश ठेवा़ उत्सवाच्या दिवशी या कलशांची संख्या वाढवा़ नदीत वरील प्रकार होऊ नयेत यासाठी संबंधित विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एक पथक नेमावे़ हे पथक सतत नदीजवळ गस्त घालेल. यात कोणी नदीत घाण करताना आढळल्यास त्याच्यावर या पथकाने बॉम्बे पोलीस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवून कारवाई करावी़ तसेच याबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करायची असल्यास शासनाने ती करावीत, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे़
या प्रकरणी मानवी विष्ठा वाहतूकविरोधी संघटनेचे अध्यक्ष संदीप जेठे यांनी अॅड़ असिम सरोदे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे़ मानवी विष्ठा वाहतूक प्रतिबंधक कायदा १९९३मध्ये मंजूर झाला़ त्याअंतर्गत हे काम करणाऱ्यांसाठी घरकुलासह विविध योजना राबवणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते व हे काम मानवाकडून न करता अत्याधुनिक तंत्राद्वारे केले जाणार होते़
मात्र पंढरपूर मंदिरात येणारे भाविक चंद्रभागा नदीपात्रातच प्रात:कालीन विधी करतात व त्यांची विष्ठा मानवाकडूनच उचलली जाते़ हे बंद करावे व राज्यात वरील कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयानेच शासनाला द्यावेत,
अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिले़ तसेच पंढरपूर येथे हे काम करणाऱ्यांचे पुनर्वसन कसे करणार याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने तेथील स्थानिक प्रशासनाला दिले आहेत़