ऑनलाइन लोकमततेर, दि. १९ : शासनाच्या वतीने १९९५ पासून पहिली ते आठवीचा विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या योजनेमुळे विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली. तसेच पटसंख्याही टीकून राहिली. असे असतानाच वाणेवाडी शाळेसह काजळा केंद्रातील तब्बल नऊ शाळांना तांदूळ पुरवठा न झाल्याने अनेक दिवसांपासून पोषण आहारच शिजत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा फटका एक -दोन नव्हे, तर बाराशेवर विद्यार्थ्यांना बसत आहे.
वाणेवाडी येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदची शाळा असून या शाळेमध्ये ९९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक आर.पी. खडके यांनी आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यासाठी लागणारा तांदूळ पुरवठा करण्याची मागणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे ४ जुलै रोजी केली आहे. परंतु, आजपावेतो तांदूळ उपलब्ध न झाल्याने २० जुलैपासून या शाळेतील विद्यार्थ्यांचा पोषण आहार बंद आहे.
वाणेवाडीप्रमाणेच काजळा केंद्राअंतर्गत येणाऱ्या रामवाडी, दाऊदपूर, वाघोली, भंडारवाडी, आरणी, इर्ला, टाकळी-ढोकी, आनंदवाडी येथील शाळांची अवस्था झाली आहे. रामवाडी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. येथील पोषण अहार १ आॅगस्टपासून म्हणजेच वीस दिवसांपासून बंद आहे. याही शाळेला तांदूळ पुरवठा झालेला नाही. याही शाळेच्या मुख्याध्यापकाने ४ जुलैै रोजीच तांदूळ मागणी केला आहे. अशीच अवस्था भंडारवाडी शाळेची आहे. येथील शाळेत १६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहे.
त्याचप्रमाणे टाकळी-ढोकी येथील १६०, आरणी येथील १५५, वाणेवाडी येथील ९९, रामवाडी येथील १५४, इर्ला येथील १५६, दाऊदपूर येथील ६०, आनंदवाडी येथील १०० असे एकूण बाराशेवर विद्यार्थी सध्या पोषण आहाराविनाच ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांना महाराष्ट्र को-आॅप. कंझुमर्स फेडरेशन, मुंबई यांच्यामार्फत तांदूळ पुरवठा केला जातो. परंतु वेळेवर तांदूळ पुरवठा केला जात नसल्याने काजळा केंद्रांतर्गत येणाऱ्या नऊ गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आॅगस्ट व सप्टेंबरसाठी लागणाऱ्या तांदळाची मागणी ४ जुलै रोजी मागणी केली आहे. परंतु, तांदूळ उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पोषण आहार शिजवला जात नाही.- आर. पी. खडके, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद, प्रशाला, वाणेवाडी.