काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचे निलंबन मागे
By Admin | Updated: April 2, 2017 01:40 IST2017-04-02T01:40:59+5:302017-04-02T01:40:59+5:30
राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत प्रचंड गदारोळ करणे, फलक फडकविले, टाळ वाजविले आणि विधानभवन परिसरात

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांचे निलंबन मागे
मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत प्रचंड गदारोळ करणे, फलक फडकविले, टाळ वाजविले आणि विधानभवन परिसरात अर्थसंकल्पाची होळी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांपैकी ९ जणांचे निलंबन शनिवारी सरकारने मागे घेतले.
विधानसभेत ठरावाद्वारे १९ आमदारांना ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, शनिवारी त्यातील ९ जणांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी मांडला. बापट यांनी सांगितले की, १९ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली होती. या आमदारांनी शिस्तभंग केला असला तरी त्यांना जास्त काळ सभागृहाबाहेर ठेवणे हे योग्य नाही म्हणून त्यातील नऊ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा ठराव सरकारने आणला आहे.
उर्वरित १० आमदारांचे निलंबन हे बुधवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात मागे घेण्यात येईल, अशी शक्यता आहे. ९ जणांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादीने सभागृहाच्या कामकाजावर टाकलेला बहिष्कार कायम ठेवला. दोन्ही पक्षांचे आमदार सध्या संघर्षयात्रेत व्यग्र आहेत. (विशेष प्रतिनिधी)