नऊ अभियंते निलंबित
By Admin | Updated: September 24, 2014 05:32 IST2014-09-24T05:32:51+5:302014-09-24T05:32:51+5:30
ई निविदेतील भ्रष्टाचारप्रकरणी २३ अभियंत्यांपैकी ९ जणांचे आज तत्काळ निलंबन केले़ तसेच सिस्टीममध्ये शिरून हा घोटाळा करणा-या ४० ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले

नऊ अभियंते निलंबित
मुंबई : ई निविदेतील भ्रष्टाचारप्रकरणी २३ अभियंत्यांपैकी ९ जणांचे आज तत्काळ निलंबन केले़ तसेच सिस्टीममध्ये शिरून हा घोटाळा करणा-या ४० ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे़ मात्र पारदर्शक वाटणाऱ्या ई निविदा पद्धतीतच भ्रष्टाचार झाल्यामुळे वेळेबाबत अभियंत्यांना दिलेले अधिकार रद्द करण्याचा निर्णयही आयुक्तांनी आज घेतला़ या प्रक्रियेवर संगणक प्रणालीद्वारेच नियंत्रण ठेवले जाईल.
ई निविदा प्रक्रियेत १०० कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप नगरसेवक करीत आहेत़ मात्र यामध्ये आर्थिक नुकसान नसल्यामुळे यास भ्रष्टाचार म्हणता येणार नाही, असा पवित्रा आयुक्त सीताराम कुंटे यांनी सोमवारी घेतला होता़ मात्र हाच मुद्दा उचलून धरीत सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेच्या महासभेत आयुक्त कुंटे यांना जाब विचारला़ या वेळी आयुक्तांनी खुलासा करताना प्रथमदर्शी २३ अभियंते गुंतल्याचे आढळून आले आहे़ त्यांची विभागीय चौकशी व ९ जणांचे निलंबन केल्याचे सांगितले़
प्रभागातील ४१२ कामांपैकी १८३ पूर्ण करण्यात आली़ ९ कोटी २६ लाखांच्या या कामांमध्ये सर्वांत कमी निविदा भरणाऱ्याला कंत्राट दिले असते तर ६ कोटी ४१ लाख रुपये खर्च आला असता़ त्यामुळे ३ कोटींचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे आयुक्तांनी कबूल केले़
तसेच भविष्यात असे धोके टाळण्यासाठी निविदेच्या वेळेबाबत विभाग अभियंत्यांना दिलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)