निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगडकडे
By Admin | Updated: October 20, 2015 01:24 IST2015-10-20T01:24:49+5:302015-10-20T01:24:49+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. खेड, चिपळूण आणि

निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगडकडे
- प्रकाश वराडकर, रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. खेड, चिपळूण आणि संगमेश्वर हे तीन तालुके चौपदरीकरणाच्या देखरेखीसाठी रायगड जिल्ह्याकडे देण्यात आल्याने येथील कामावर महाड व पेण विभागाचे अधिकारी देखरेख करणार आहेत. उंटावरून शेळ्या हाकण्याच्या या प्रकारामुळे कामाच्या दर्जावर नियंत्रण राहील का? आणि
भविष्यात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी
पेण विभागाकडेच जावे लागेल
का, असे प्रश्न निर्माण झाले
आहेत.
राज्याच्या मंत्रालय पातळीवर हा निर्णय घेण्यात आला असून, १ आॅक्टोबरला तसा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. चौपदरीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत आधी जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले होते. राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या प्रत्येक उपविभागाकडे दोन तालुके देखरेखीसाठी देण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम हे त्याच जिल्ह्यातील महामार्ग विभागाच्या देखरेखीखाली व्हावे, असेही ठरविण्यात आले होते. मात्र, त्यात काही अधिकाऱ्यांनी राज्यपातळीवर ढवळाढवळ केल्याची चर्चा असून, त्यांचा यामागील हेतू काय तसेच या संपूर्ण प्रकारामागे नेमके कोण आहेत, असे प्रश्न विचारले जात आहेत.
हातचलाखीचा विषय केंद्रापर्यंत
मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या सुरात सूर मिसळून चौपदरीकरणाबाबत करण्यात आलेली ही ‘हातचलाखी’ लक्षात आल्याने व जिल्हावर अन्याय होऊ नये म्हणून जिल्ह्यातीलच एका मोठ्या नेत्याने हा वादग्रस्त विषय केंद्राकडे पोहोचविला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागालाही याबाबत विश्वासात घेतले गेलेले नाही, तसेच झालेली कामाची विभागणी ही अयोग्य असून, पूर्वीसारखेच नियोजन न ठेवल्यास चौपदरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होतील, असा इशारा या नेत्याने संबंधितांना दिला असल्याचे सूत्रांकडून कळते.