निलेश राणेंनी सोडलं काँग्रेसचं प्रदेश सरचिटणीसपद

By Admin | Updated: March 21, 2017 14:18 IST2017-03-21T14:18:24+5:302017-03-21T14:18:24+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

Nilesh Ranee left Congress Congress Secretary General | निलेश राणेंनी सोडलं काँग्रेसचं प्रदेश सरचिटणीसपद

निलेश राणेंनी सोडलं काँग्रेसचं प्रदेश सरचिटणीसपद

>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 21 - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तब्बल दीड वर्षे रत्नागिरीत काँग्रेस जिल्हाध्यक्षाची नियुक्तीच झाली नसल्याच्या मुद्यावरुन राणे यांनी चव्हाण यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पक्षांतराबाबतच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू असताना निलेश राणे यांनी दिलेला पदाचा राजीनामा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
 
विधानसभा निवडणुकांनंतर रमेश कीर यांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले आहे. त्यानंतर झालेल्या नगर परिषद तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरे गेलेल्या काँग्रेसकडे जिल्हाध्यक्षच नव्हता. जिल्ह्यातील पाच तालुक्यात निलेश राणे यांनी तर चार तालुक्यात भाई जगताप यांनी उमेदवार निवडीसह सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या.
 
या एकूणच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मंगळवारी (21 मार्च) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे आपल्या काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी जिल्हाध्यक्ष निवडीबाबत झालेल्या दिरंगाईबाबत तीव्र शब्दात आपली मते व्यक्त केली आहेत. जिल्हाध्यक्षच नेमू शकत नसलेल्या पक्षाला आम्ही मतदान का करायचे, असा प्रश्न प्रचारादरम्यान आपल्याला विचारला जात होता आणि त्यामुळेच काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. 
 
जिल्हाध्यक्ष नियुक्तीबाबत दीड वर्षे पाठपुरावा करूनही आपण हा विषय गांभीर्याने हाताळलेला नाही, त्यामुळे तुमच्यासोबत काम करणे मला जमणार नाही, असे निलेश यांनी पत्रातून स्पष्टपणे सुनावले आहे. आपण पक्षाकडे कधीही काहीही मागितलेले नाही. असे असतानाही आपल्याला जिल्हाध्यक्ष पदाबाबतचा तुम्ही निर्णय देत नसाल आणि पदाचा वापर हा फक्त आपल्यापुरताच करत असाल तर भविष्यात काँग्रेसची अवस्था आणखी दयनीय होईल, असा सणसणीत टोलाही त्यांनी हाणला आहे.
गेले काही दिवस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांचा हा राजीनामा दखलपत्र ठरणार आहे. अर्थात प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला तरी आपण काँग्रेस पक्षातच काम करत राहणार असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
निलेश राणे यांचे पत्र
प्रति,
मा. श्री. अशोकराव चव्हाण
प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
टिळक भवन, दादर, मुंबई ४०००२५
विषय : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सरचिटणीस पदाच्या राजीनाम्याबाबत...
महोदय, 
आपल्याबरोबर मागील दीड वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्याला अध्यक्ष देण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर प्रत्यक्षरित्या भेटत होतो, पत्रव्यवहार करत होतो, निवेदन देत होतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे काही पक्षाला नुकसान झाले, पराभव बघावा लागला त्याचे प्रमुख कारण जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष नाही हेच होते. प्रचाराच्या दरम्यान जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा सातत्याने लोक, स्थानिक मतदार आम्हाला विचारत होते. ज्या पक्षाकडे जिल्हाध्यक्ष नाही, गेली दीड वर्ष तुम्हाला प्रदेश पातळीवरुन जिल्हाध्यक्ष देत नाही अशा पक्षाला आम्ही मतदान का करावे? त्याचबरोबर पंतप्रधान मोदींची लाट, भारतीय जनता पार्टी-शिवसेनेत असलेले नियोजन आणि सरकारी यंत्रणा या सगळ्याच जमेच्या बाजू त्यांच्यासोबत असल्याने आपल्या पक्षाला फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पक्षाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सर्वांना एकत्रित करुन काँग्रेस पक्ष टिकवायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पण असे असले तरी संघटनात्मक पातळीवर जिल्हाध्यक्ष पद हे अतिशय महत्त्वाचे पद मानले जाते. ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष पदाला मोठा मान असतो. आपणास हे सर्व माहीत असून सुद्धा या विषयावर आपण लक्ष घातलेले नाही. लक्ष बोलण्यापेक्षा तुम्ही हा विषय गांभीर्याने हाताळला नाही आणि म्हणून सरचिटणीस या नात्याने तुमच्यासोबत काम करणं हे मला शक्य नाही व ते मला जमणार नाही, कारण एका जिल्ह्याला तुम्ही जिल्हाध्यक्ष देऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये जे काही चित्र दिसलं ते स्वाभाविकच आहे असे वाटते आणि यापुढे तुमच्या नेतृत्वाखाली जर असाच कारभार चालत राहणार अ सेल तर त्याचा वाटेकरी मला व्हायचं नाही. लोकसेवेसाठी व लोकहितासाठी आम्ही समाजसेवेमध्ये आलो आहोत. कुठल्याही पदासाठी नाही किंवा पक्षाकडून काहीही मिळावे यासाठी नाही. पक्षाकडे आम्ही कधी काही मागितले सुद्धा नाही. असे असून जर तुम्ही निर्णय देत नसाल आणि तुमच्या पदाचा वापर हा फक्त तुमच्यासाठीच जर करत असाल तर भविष्यामध्ये अजून दयनीय परिस्थिती काँग्रेस पक्षाची होईल. तुम्ही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला जर बळ देऊ शकत नाही तर अशा प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये राहणे मला शक्य होणार नाही. पण त्याहून पुढे सांगतो की त्या पदाचा अपमान होईल. दयनीय अवस्था पक्षाची होईल याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. नुसता प्रभारी देऊन जिल्ह्याचा कारभार प्रभाºयाला समजत नसतो व जिल्ह्याची संघटना बदलत नसते किंवा वाढत नसते याची जाणीव तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याकडे बघून झाली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची पद्धत ही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देणाी असली पाहिजे. अध्यक्षाचं काम हे पक्षाला उभं करण्याचं असतं, बळ देण्याचं असतं. पण दोन वर्ष झाली, रत्नागिरी जिलल्ह्यात जे काही चित्र मी बघत आहे. कारण लोकसभा मी त्या मतदारसंघातून लढवतो. या जिल्ह्यातील पाच तालुके माझ्या लोकसभेच्या मतदारसंघात येतात. असे असून सुद्धा आम्हाला तिथे निवडणूक लढवायची आहे हे सांगून सुद्धा तुम्ही योग्य पद भरत नसाल तर त्याच्यामध्ये एक वेगळा राजकीय वास निर्माण होत आहे असे मला वाटते. आपण जर योग्य भूमिका घ्याल तर चांगली लोक पक्षात येतील. चांगली लोक पक्षात काम करतील. मात्र असाच कारभार राहिला तर उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही लोक तिकीट मागायला समोर येणार नाहीत. असे दिवस काँग्रेसला दिसू नयेत म्हणून आपपल्याला सांगतो की अगोदरच फार उशीर झालाय तर अजून किती नुकसान तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचं करणार आहात हेच आम्हाला आता बघायचंय. तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदाचा राजीनामा मी देत आहे. परंतु यापुढेही काँग्रेस पक्षाचं काम करतच राहाणार. 
(निलेश नारायण राणे)

Web Title: Nilesh Ranee left Congress Congress Secretary General

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.