बॅँक फसवणूकप्रकरणी नीलेश पारीखला अटक
By Admin | Updated: May 9, 2017 01:59 IST2017-05-09T01:59:51+5:302017-05-09T01:59:51+5:30
देशभरातील २० बँकांकडून फंडिंगच्या नावाखाली घेतलेल्या रकमेतून २ हजार २२३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कोलकात्यातील

बॅँक फसवणूकप्रकरणी नीलेश पारीखला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशभरातील २० बँकांकडून फंडिंगच्या नावाखाली घेतलेल्या रकमेतून २ हजार २२३ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कोलकात्यातील श्रीगणेश ज्वेलरी हाऊस लि. कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष नीलेश पारीखला सोमवारी मुंंबई विमानतळावरून अटक केली. सीबीआयने ही कारवाई केली आहे.
कोलकाता येथील सोने व्यापारी कंपनीचा मालक असलेल्या पारीख याने २० राष्ट्रीय बँकांसोबत आणखी पाच सहकारी बँकांकडून २ हजार ६७२ कोटी रुपये कर्जाऊ घेतले होते. सोने आयात करून दागिने बनवून निर्यात करण्याचा व्यवासय कंपनी करत असल्याचे पारीख यांनी बँकांना दाखविले होते. यातच हाँगकाँंग, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये काही कंपन्या असल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची आयात-निर्यात केल्याचे दाखवत यात आपल्याला नुकसान झाल्याचे जाहीर केले. फसवणूक झालेल्या बँकांच्या वतीने स्टेट बँक आॅफ इंडियाने याप्रकरणी तक्रार दिली.
या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला. गुन्हा दाखल होताच पारीख दुबईला पळून गेला होता. सोमवारी तो मुंबईत येणार असल्याची माहिती सीबीआयला मिळाली. त्यानुसार सीबीआयने सापळा रचून त्याला मुंबई विमानतळावरुन अटक केली.