मुंबई - दिशा सालियन प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका करून सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आता या याचिकेवरुन दिशा सालियनच्या वडिलांचे वकील नीलेश ओझा यांनी न्यायमूर्ती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांचे कनेक्शन असल्याचा दावा केला. तसेच, न्यायमूर्तींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे.
ओझा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत केलेल्या आरोपात पोलिसांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट बोगस होता, असा दावा करत पोलिसांनी हा रिपोर्ट परत घेत याप्रकरणी तपास सुरू केला असल्याचे सांगितले तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे नव्याने तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकून पुरावे बदलण्याची शक्यता आहे.
मुंबईचे पोलिस आयुक्त असताना त्यांनी काही महत्त्वाच्या प्रकरणांंमध्ये खोटे गुन्हे दाखल केले तसेच दोन बड्या प्रकरणात हत्या असताना आत्महत्या दाखवल्या तसाच, त्यांनी दिशा हिच्या सामूहिक बलात्कारानंतर हत्याप्रकरणात आत्महत्या दाखवून खोटे पुरावे, अहवाल तयार केल्याचा आरोप ओझा यांनी केला. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी उद्या बुधवारी सुरू होणार आहे. याआधीच वकील ओझा यांन थेट न्यायाधीशांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.
स्टिंग ऑपरेशनचे पुरावे...- सिंग यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलेल्या दोन अधिकाऱ्यांनी आपल्याला त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे दिले आहेत. तसेच, यातील एका अधिकाऱ्याने परमबीर सिंग यांचे जवळचे सहकारी कदम यांचे स्टिंग ऑपरेशन केले आहे. - त्यात त्याने एका महिला पोलिसाची हत्या ही आत्महत्या म्हणून दाखवल्याचे पुरावे सापडले आहेत. तसेच, एका आयआरएस अधिकाऱ्याकडे याप्रकरणातील आरोपींच्या मोबाईल टाॅवर लोकेशनचे पुरावे आहेत. - दिशाच्या हत्याप्रकरणात आपल्याकडे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. याप्रकरणातील साक्षीदारांना संरक्षण पुरविण्याची मागणी वकील नीलेश ओझा यांनी केली आहे.