पुढील वर्षी म्हाडाची दहा हजार घरे !
By Admin | Updated: March 29, 2016 03:56 IST2016-03-29T03:56:11+5:302016-03-29T03:56:11+5:30
सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण पुढल्या वर्षी कोकणासह मुंबईत दहा हजार परवडणाऱ्या दरातील घरे जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे. तशी घोषणाच म्हाडाने

पुढील वर्षी म्हाडाची दहा हजार घरे !
मुंबई : सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार करणारे म्हाडा प्राधिकरण पुढल्या वर्षी कोकणासह मुंबईत दहा हजार परवडणाऱ्या दरातील घरे जनतेसाठी उपलब्ध करून देणार आहे. तशी घोषणाच म्हाडाने सोमवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात केली आहे. म्हाडा प्राधिकरणाने ६ हजार ५०८.१९ कोटींचा अर्थसंकल्प मांडला आहे. घरे बांधण्यासाठी जमीन खरेदी करता यावी, म्हणून अर्थसंकल्पात २५७.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे २०१५-१६चे सुधारित अर्थसंकल्प अंदाजपत्रक व २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाला प्राधिकरणाच्या सोमवारच्या विशेष बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राधिकरणांतर्गत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद व कोकण ही सात प्रादेशिक गृहनिर्माण मंडळे तर मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ तसेच झोपडपट्टी सुधार मंडळ कार्यरत आहेत. अर्थसंकल्पानुसार, म्हाडाच्या उपलब्ध जमिनीवरील कार्यक्रमांबरोबरच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरबांधणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शिवाय त्यासह जवळपास ३ हजार ९०० कोटी रुपयांचा खर्च २०१६-१७ मध्ये अपेक्षित आहे. भविष्यकालीन आवश्यकता विचारात घेता २५७.९० कोटींची तरतूद जमीन खरेदी व जमीन विकासासाठी पुढील वर्षासाठी करण्यात आली आहे. इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून २०१५-१६ मध्ये ६७१ मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षी ६८० इमारतींची दुरुस्ती करणे प्रस्तावित आहे. पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतील इमारतीच्या देखभालीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.