पुढच्या वर्षी म्हाडाच्या ६,२०० घरांची लॉटरी
By Admin | Updated: June 1, 2015 05:10 IST2015-06-01T05:10:51+5:302015-06-01T05:10:51+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळासह मुंबई मंडळाच्या सुमारे ६,२०० घरांची लॉटरी पुढच्या वर्षीच्या जानेवारी/फेब्रुवारी आणि मे महिन्यांत काढण्यात येणार आहे. परिणामी, आजच्या रविवारी ज्यांची संधी हुकली आहे

पुढच्या वर्षी म्हाडाच्या ६,२०० घरांची लॉटरी
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळासह मुंबई मंडळाच्या सुमारे ६,२०० घरांची लॉटरी पुढच्या वर्षीच्या जानेवारी/फेब्रुवारी आणि मे महिन्यांत काढण्यात येणार आहे. परिणामी, आजच्या रविवारी ज्यांची संधी हुकली आहे; अशांना म्हाडा प्राधिकरणाने पुन्हा एकदा दिलासा दिला असून, नव्या लॉटरीमध्ये भाग्यवंतांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या १,0६३ घरांची लॉटरी काढण्यात आल्यानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. झेंडे यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. ते म्हणाले, पुढच्या वर्षी म्हाडाच्या कोकण मंडळ आणि मुंबई मंडळाच्या घरांची स्वतंत्र अशी लॉटरी काढण्यात येणार आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी विरार येथे ४,७०० घरे असणार आहेत. ही घरे अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. तर मुंबई मंडळाच्या १,५०० घरांचा समावेश लॉटरीमध्ये आहे. मुंबईमधील लॉटरीसाठीची घरे पवई, बोरीवली, गोरेगाव व मुलुंड येथे असणार असून, ती अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या लॉटरीसाठीच्या घरांची किंमत सर्वसाधारण किमतीपेक्षा ६० टक्क्यांनी कमी असून, पुढील लॉटरीच्या घरांच्या किमतीमध्ये ४ ते ५ टक्क्यांचा
फरक पडण्याची शक्यता आहे.
लॉटरीच्या घरांसाठी ठाणे जिल्ह्यातील भूखंडाचाही शोध सुरू असल्याचे झेंडे यांनी या वेळी नमूद केले. (प्रतिनिधी)