पुढील वर्षी ‘गोवरमुक्त महाराष्ट्र अभियान’ - डॉ. सावंत

By Admin | Updated: May 7, 2017 04:46 IST2017-05-07T04:46:48+5:302017-05-07T04:46:48+5:30

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून ‘रुबेला मिजल (गोवर)मुक्त महाराष्ट्र’ अभियान फेब्रुवारी २०१८ पासून राबविण्यात येणार

Next year 'Govar Muktarkar Maharashtra Campaign' - Dr. Sawant | पुढील वर्षी ‘गोवरमुक्त महाराष्ट्र अभियान’ - डॉ. सावंत

पुढील वर्षी ‘गोवरमुक्त महाराष्ट्र अभियान’ - डॉ. सावंत

 लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून ‘रुबेला मिजल (गोवर)मुक्त महाराष्ट्र’ अभियान फेब्रुवारी २०१८ पासून राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ९ महिने ते १५ वर्षांच्या मुला-मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रतिनिधी हँक बॅकेडम यांनी शुक्रवारी मंत्रालयात आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली. या वेळी राज्याच्या आरोग्याच्या विविध बाबींविषयी चर्चा करण्यात आली. या वेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेने विविध आजारांवरील लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. राज्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जागतिक आरोग्य संघटनेच्या बॅकेडम यांनी कौतुक केले. या अभिनव योजनेच्या माध्यमातून उपचाराबरोबर मोफत शस्त्रक्रिया केली जात असल्याने, सामान्यांना त्याचा फायदा होत असल्याचे बॅकेडम यांनी सांगितले. राज्यात पोलिओ लसीकरण मोहिमेवर विशेष लक्ष देण्यात आले असून, मालेगाव व भिवंडी शहरांमध्ये लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात यश आले आहे. मात्र, निमशहरी भागात लसीकरणाच्या दरम्यान अडचणी येत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी आदिवासी भागामध्ये १०० टक्के लसीकरण होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घ्यावा. राज्यातील १५ आदिवासी जिल्ह्यांमध्ये बालकांना लसीकरणाची मोहीम हाती घ्यावी व तिचे संनियंत्रण जागतिक आरोग्य संघटनेने करावे. त्याचप्रमाणे, राज्यातील निम्म्याहून अधिक जिल्हे मलेरियामुक्त झाले असून, गडचिरोलीमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या भागातही लसीकरण मोहीम आणि संशोधन हाती घ्यावे. राज्यात अन्य आजारांबरोबरच विल्सन डिसीजचे रुग्ण आढळून येतात. महाराष्ट्रासाठी या संदर्भात विशेष प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी आरोग्यमंत्र्यांनी या वेळी केली.

स्वाइन फ्लूसाठी नवीन लस
राज्यात स्वाइन फ्ल्यूचा काही भागांत प्रादुर्भाव आहे. त्यावर उपाययोजना आणि उपचारासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. जाणीव-जागृतीबरोबरच राज्यभर सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचबरोबर, ज्या महापालिका क्षेत्रामध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येतात, त्या महापालिका आयुक्तांशी आरोग्य विभाग सातत्याने संपर्कात राहून मार्गदर्शन करीत आहे. स्वाइन फ्लूवर पुढील वर्षी नवीन लस आणण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने तयारी केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Next year 'Govar Muktarkar Maharashtra Campaign' - Dr. Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.