बँकांचा आगामी आठवडा सुट्यांचा!
By Admin | Updated: September 24, 2014 05:29 IST2014-09-24T05:29:31+5:302014-09-24T05:29:31+5:30
आगामी आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि जोडून येणाऱ्या सुट्या यामुळे जवळपास सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत

बँकांचा आगामी आठवडा सुट्यांचा!
मुंबई : आगामी आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि जोडून येणाऱ्या सुट्या यामुळे जवळपास सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी, २९ आॅक्टोबर रोजीच बँकांचे व्यवहार मार्गी न लावल्यास या व्यवहारांसाठी ७ आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
येत्या ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी बँका अर्धवार्षिक कामांमुळे जरी सुरू असल्या तरी ग्राहकांसाठी त्या बंद असतील. त्यानंतर २ आॅक्टेबरला गांधी जयंती, ३ आॅक्टोबरला दसरा आल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. तर ४ आॅक्टोबर रोजी शनिवार असल्याने सर्व बँका अर्धा दिवस खुल्या असतील. ५ आॅक्टोबरला रविवार आल्याने आठवड्याची सुट्टी आहे. यावर्षी बकरी ईद ५ आॅक्टोबरला आहे. मात्र सरकारी अधिसूचनेनुसार दिनदशिर्केत ६ आॅक्टोबरला बकरी ईद नमूद करण्यात आली असल्यामुळे बँकांना सोमवारी सुट्टी आहे. त्यानंतर मंगळवारी ७ तारखेला बँका नियमितपणे सुरू होतील. परंतु आठवडाभराची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी बराच वेळ जाणार आहे. साहजिकच ७ आणि ८ आॅक्टोबरला बँकांमध्ये प्रचंड गर्दी उसळेल. त्यामुळे अतिमहत्त्वाची बँकांची कामे २९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली नाहीत, तर ७ आॅक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)