भररस्त्यात नवविवाहितेचा खून

By Admin | Updated: May 7, 2015 00:24 IST2015-05-07T00:24:37+5:302015-05-07T00:24:37+5:30

आठच दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर प्रथमच माहेरी आलेल्या प्रियंका जगताप ऊर्फ खराडे (२४) या नवविवाहितेचा भररस्त्यात खून झाल्याची घटना ठाण्यात घडली.

Newly-married blood | भररस्त्यात नवविवाहितेचा खून

भररस्त्यात नवविवाहितेचा खून

आठ दिवसांपूर्वीच झाले होते लग्न : एकतर्फी प्रेमातून खून झाल्याचा संशय

ठाणे : आठच दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर प्रथमच माहेरी आलेल्या प्रियंका जगताप ऊर्फ खराडे (२४) या नवविवाहितेचा वागळे इस्टेट येथील पासपोर्ट कार्यालयाच्या मागील बाजूकडील पदपथावर एका तरुणाने चॉपरने वार करून खून केला. बुधवारी दुपारी २ च्या सुमारास हा प्रकार घडला. तिच्या हत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
वागळे इस्टेटच्या किसननगर भागात राहणारी प्रियंका रोड क्र. १६ येथील ‘सन अ‍ॅण्ड स्टार’ या जाहिरात कंपनीत लेखापाल म्हणून गेल्या चार महिन्यांपासून कार्यरत होती. २८ एप्रिल २०१५ रोजी सातारा जिल्ह्यातील दरूज (ता. खटाव) येथे प्रमोद खराडे यांच्याशी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर २ मे रोजी ती कल्याण येथील पतीच्या घरी आली होती.
कोपरीच्या के.बी. कॉलेजमध्ये एमकॉमचा पेपर असल्यामुळे पती प्रमोद यांच्यासमवेत ती ५ मे रोजी माहेरी आली होती. बुधवारी पडवळनगरमधील आपल्या चुलत्यांना मिठाई देऊन येते, असे म्हणून ती दुपारी घराबाहेर पडली. त्यानंतर, थेट तिच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांकडून कळल्याचे तिची आई विमल यांनी सांगितले.
पासपोर्ट कार्यालयाच्या मागील रोड क्र. १० येथील रस्त्यावरून ती आणि हल्लेखोर असे दोघे येत असताना त्याने अचानक तिच्या मानेवर चॉपरने हल्ला केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हाही चॉपर तिच्या गळ्यात रुतलेल्या अवस्थेत होता. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
एकाने हल्ला केल्यानंतर इतर साथीदार पाळतीवर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी ती कामाला असलेल्या ‘सन अ‍ॅण्ड स्टार’ या कंपनीतील तिच्या सहकाऱ्यांची तसेच नातेवाइकांची चौकशी करण्यात येत असल्याचे वागळे इस्टेट परिमंडळचे पोलीस उपायुक्त व्ही.बी. चंदनशिवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

सगळेच चांगले, मग खून केला कुणी ?
लग्नाचा बस्ता प्रियंकाच्या पसंतीनेच घेतला होता. तीन ते चार लाखांची जमवाजमव करून मोठ्या हौसेने तिचे लग्नही केले. माहेरी आल्यानंतरही सासरची माणसे खूप चांगली आहेत. परीक्षेनंतर लगेच सासरी जाईन, असेही ती म्हणाल्याचे आई विमल जगताप यांनी सांगितले. लग्नही तिच्या पसंतीनेच झाले असल्यामुळे ती आनंदी होती. मग, माझ्या निष्पाप मुलीला कोणी मारले, असा सवाल करून त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.

घरची परिस्थिती बेताची
ट्रकचालक असलेल्या रोहिदास जगताप यांची प्रियंका ही मोठी मुलगी. तिचा भाऊ अक्षय हा कोल्हापूरच्या गरवारे महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तर बहीण नम्रता बीएससीच्या दुसऱ्या वर्गात मुंबईच्या सोमय्या महाविद्यालयात शिकते. या खुनानंतर तिच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. रोहिदास यांचा मित्र परिवार आणि वागळे इस्टेट ट्रक-टेम्पो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही वागळे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

रेखाचित्रे तयार
या खूनप्रकरणी रेखाचित्रे तयार करण्यात आली असून तीन तपास पथकेही तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हल्लेखोर परिचित असल्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे. पोलीस निरीक्षक सुलभा पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

घटनास्थळाजवळील काही सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले असून हल्लेखोर परिचित होता का, याबाबतचीही चाचपणी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

प्रियंका सुस्वभावी होती. लग्न आणि परीक्षेचा तिच्यावर थोडा ताण वाटत होता. तिच्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने आम्हालाही धक्का बसल्याचे तिच्या कंपनीतील सहकारी रोशनी पालव हिने सांगितले, तर कार्यालयातील बिझी शेड्युलमुळे एकमेकांचे इतके बोलणेही होत नव्हते, असे देविप्रसाद चव्हाण आणि जितेंद्र भोवड या दुसऱ्या सहकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Newly-married blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.