शासकीय कर्मचाऱ्यांना न्यू इअर ‘हॅप्पी’
By Admin | Updated: January 1, 2015 00:18 IST2014-12-31T21:53:15+5:302015-01-01T00:18:17+5:30
सुट्यांचा बोनस : वर्षभरात २५ दिवस कामकाज राहणार बंद

शासकीय कर्मचाऱ्यांना न्यू इअर ‘हॅप्पी’
शोभना कांबळे- रत्नागिरी -२०१५ या नव्या वर्षात अनेक शासकीय सुट्या रविवारला जोडून आल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना रविवारसोबत जोडून या सुट्यांचा बोनस मिळणार आहे.
नवीन वर्षात शनिवारी आलेल्या सुट्या पाच, सोमवारी आलेल्या सुट्या १ अशा महाराष्ट्र शासनाने २०१५ या वर्षासाठी एकूण २५ सुट्या जाहीर केल्या आहेत. यापैकी ४ जानेवारी २०१५ या दिवशी मुस्लिम बांधवाचा ईद इ मिलाद हा सण येत आहे. ही केवळ एकच सुटी रविवारी येत आहे. गुढी पाडवा (शनिवार, २१ मार्च), राम नवमी (शनिवार, २८ मार्च), रमजान ईद (शनिवार, १८ जुलै), स्वातंत्र्यदिन (शनिवार, १५ आॅगस्ट), मोहरम (शनिवार, २४ आॅक्टोबर) या पाच सुट्या शनिवारी येत असल्याने कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार अशा सलग सुटीचा आनंद मिळणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिन (सोमवार, २६ जानेवारी) आणि बुद्ध पौर्णिमेचीही सुटी (सोमवार, ४ मे) रविवारला जोडून मिळणार आहे.
नवीन वर्ष म्हटलं की हॅप्पी न्यू इअर अशा शुभेच्छा दिल्या जातात. या शुभेच्छा घेऊन खरोखरच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष आणखी सुखद असणार आहे. कारण या वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्याच सुट्ट्या मिळणार आहेत. हा सुट्ट्यांचा बोनस दिवाळीव्यतिरिक्त आणखी एक जादा बोनस असणार आहे.
या वर्षात सलग दोन सुट्याही आल्या आहेत. एप्रिलमध्ये तर अशा सुट्या अधिकच आल्या आहेत. २ एप्रिलला (गुरूवार) महावीर जयंती आणि ३ एप्रिलला गुड फ्रायडे अशी दोन दिवस सुटी जाहीर करण्यात आली असून, मध्ये शनिवार गेल्यानंतर पुन्हा रविवारची हक्काची सुटी मिळणार आहे.
अशीच सुटी एप्रिल आणि आॅगस्टमध्ये आली आहे. ११ एप्रिल या दुसऱ्या शनिवारनंतर १२ रोजी रविवारी अशी दोन दिवस सुटी मिळणार आहे. सोमवारी १३ रोजी ताजेतवाने होऊन काम केल्यानंतर पुन्हा १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची सुटी मिळणार आहे.
स्वातंत्र्यदिनाची सुटी शनिवारी येत असून, रविवारी हक्काची सुटी. त्यानंतर सोमवारी एक दिवस काम केल्यानंतर मंगळवारी, १८ आॅगस्टला पारशी नववर्षाची सुटी उपभोगता येणार आहे.
प्रजासत्ताक दिन, बकरी ईदची सुटीही चौथ्या शनिवारला जोडून आली आहे. प्रजासत्ताक दिन सोमवारी असल्याने चौथा शनिवार आणि रविवारला जोडून आला आहे. बकरी ईद २५ सप्टेंबरला आली आहे. या दिवशीही शुक्रवार असल्याने कर्मचाऱ्यांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशी सलग तीन दिवसांची सुटी मिळणार आहे.
वर्षाच्या अखेरीस तर ईद ए मिलाद (गुरूवार, २४ डिसेंबर), ख्रिसमस (शुक्रवार, २५ डिसेंबर), आणि २६ रोजी चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग चार सुट्यांचा भरघोस बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
उर्वरित सुट्या मात्र, बुधवारी आणि गुरूवारी आल्या आहेत. एकंदरीत या वर्षात शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक सलग सुट्यांचा आनंद मिळणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून शासकीय कर्मचाऱ्यांना हा सुट्ट्यांचा बोनस सुरू होणार आहे.
सुट्टी! सुट्टी!! सुट्टी!!!
मुस्लिम धर्माचे पे्रषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ‘ईद ए मिलाद’ यावर्षी दोन वेळा आला आहे. राज्य शासनाने येत्या ४ जानेवारी २०१५ आणि २४ डिसेंबर २०१५ अशा दोन दिवशी सुटी जाहीर केली आहे.
शनिवार, रविवारला जोडून आलेली सुटी
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन (सोमवार)
२५ सप्टेंबर - बकरी ईद (शुक्रवार)
शनिवारी आलेल्या सुट्या
२१ मार्च - गुढीपाडवा
२८ मार्च - रामनवमी
१८ जुलै - रमजान ईद
१५ आॅगस्ट - स्वातंत्र्यदिन
२४ आॅक्टोबर - मोहरम
सलग चार दिवस सुट्या
ईद ए मिलाद (गुरूवार, २४ डिसेंबर)
ख्रिसमस (शुक्रवार, २५ डिसेंबर)
२६ डिसेंबर रोजी चौथा शनिवार
२७ डिसेंबर रोजी रविवार.