कोल्हापुरातील नव्या पाण्याची जत्रा

By Admin | Updated: July 7, 2016 04:22 IST2016-07-07T04:22:18+5:302016-07-07T04:22:18+5:30

महाराष्ट्र दुष्काळानं होरपळला; पण त्याची झळ कोल्हापूरकरांना बसली नाही. ‘पाणी हेच जीवन’ हे नातं कोल्हापूरनं जोपासलंय; नव्हे, त्याचं जतन केलयं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. उन्हाळ्यात

A new water john in Kolhapur | कोल्हापुरातील नव्या पाण्याची जत्रा

कोल्हापुरातील नव्या पाण्याची जत्रा

- तानाजी पोवार, कोल्हापूर

महाराष्ट्र दुष्काळानं होरपळला; पण त्याची झळ कोल्हापूरकरांना बसली नाही. ‘पाणी हेच जीवन’ हे नातं कोल्हापूरनं जोपासलंय; नव्हे, त्याचं जतन केलयं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. उन्हाळ्यात पाणी पुरवून वापरणं अन् पावसाळ्यात नद्या-नाल्यांना आलेल्या नव्या पाण्याचं आषाढ महिन्यात तितक्याच भक्तिभावाने पूजन करणं, ते सवाद्य मिरवणुकीनं नेऊन ग्रामदेवतेला अर्पण करून त्या नव्या पाण्याची जत्रा करणं हेच वेगळंपण कोल्हापूरकरांनी जपलं आहे. यामागे आहे नदीविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हाच प्रमुख भक्तिभाव. यातून दिसतो तो सामाजिक व धार्मिक सलोखा!
कलांचा वारसा जपणारं हे कोल्हापूर शहर. हे जुनं खेडं आता आधुनिक शहर बनलंय; तरीही पूर्वापार पद्धतीचा याचा थाट दिवसेंदिवस वाढतच आहे. पिढ्यान्पिढ्या वारशाची शिदोरी येथे जपली गेलीय. या कलेच्या माहेरातील गल्लीबोळांत जलदेवतेची तितक्यात श्रद्धेने जपणूक होते. त्यामुळे राज्यात दुष्काळ पडला तरीही कोल्हापूरकरांना झळ पोहोचत नाही, हीच इथली श्रद्धा आहे. प्रतिवर्षी आषाढ महिन्यात पावसामुळे नद्या-नाल्यांना आलेल्या नव्या पाण्यावर पहिला मान ग्रामदेवतेचा, हाच भक्तिभाव इथे जपलाय. हेच नवं पाणी सुवासिनींच्या डोक्यांवरून वाजतगाजत नेऊन ग्रामदेवता टेंबलाई अर्थात त्र्यंबोली-मरगाई देवीला अर्पण करण्याची कृतज्ञताही इथं दिसते.
नव्या पाण्याची ही जत्रा म्हणजेच ‘गल्ली जत्रा’ होय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे नवं पाणी पुजण्याची प्रथा आहे. आषाढ महिन्यात प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी शहरातील हजारांवर तालीम, सार्वजनिक संस्थांमार्फत हा उपक्रम श्रद्धेने, एकात्मतेने व धार्मिक पद्धतीने राबविला जातो. गल्लीच्या जत्रेत राजकारणाला अजिबात थारा नसतो. ज्येष्ठ महिन्यात या जत्रेची लगबग सुरू होते... तालीम, संस्थांच्या बैठका होतात, वर्गणी ठरते, मंगळवारी अथवा शुक्रवारीची जत्रेची तारीख निश्चित होते... बस्स! पुढे वर्गणी आपोआपच जमा होते. यात्रेत खरा मान ‘पीं-ढबाक’ या वाद्याला. अवघ्या अर्ध्या फुटाची सनईसारखा आवाज करणारी पिप्पाणी व डफ इतकीच वाद्ये.
यात्रेदिवशी पहाटेपासून हेच ‘पीं-ढबाक’ वाद्य गल्ली-बोळांत पालथं घातलं जातं. कार्यकर्ते जल्लोषात असतात. पहाटेच युवक पंचगंगा नदीवर जातात. तिथं नव्या पाण्याचं पूजन होतं.. वाहत्या पाण्यात दहीभात, लिंबू, श्रीफळ अर्पण केलं जातं... कापूर पेटवून, अगरबत्ती लावून नदीला नमस्कार केला जातो... ‘सुखसमृद्धी लाभू दे, जलमाते...!’अशी प्रार्थना केली जाते... फुलांनी सजविलेल्या कलशांत नवं पाणी भरून कावडीने खांद्यावरून गल्ली-बोळांत आणलं जातं. दरम्यान, रात्रभर प्रत्येक चौकात, मंदिराच्या दारांत बकऱ्यांचा बळी दिला जातो.
नदीतून आणलेल्या नव्या पाण्याच्या मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू होते. नारळ, केळींच्या पानांसह आंब्याची पानं-फुलं आणूनही बैलगाड्या सजवतात. वाजंत्र्यांचंही आगमन होतं... दुपारी भागातील सुवासिनींना नवी साडी, गजरा घालून नटवलं जातं... लगबग वाढते. दुपारी परिसराला जत्रेचं स्वरूप येतं.. दुपारी पीं-ढबाकसह इतर वाद्यांचाही आवाज चढतो. सुवासिनींच्या डोक्यावर फुलांनी, पानांनी सजविलेले नव्या पाण्याचे कलश ठेवले जातात... मिरवणुकीला प्रारंभ होतो... साथीला हलगी कडाडली नाही तर तो कोल्हापुरी बाज कसला? सळसळता तरुणाईचा जोम लेझीममध्येही दिसतो. हे दृश्य बेभान करणारे असते. सारेच वातावरणात तल्लीन... ‘चांगभलं’चा गजर, गुलालाची उधळण... महिलांच्या अंगात देवी येण्याचाही प्रसंग घडतो... मग भोळ्या-भाबड्या महिलांची प्रश्नांची सरबत्ती ‘देवी’कडे सुरू होते... विशेष म्हणजे समर्पक उत्तरे देताना समाधानासाठी ‘ती’ देवी भंडाराही देते... त्यानंतर पुन्हा ‘इडा-पीडा टळू दे’ अशा भावना व्यक्त करीत लिंबू कापून टाकला जातो. मिरवणूक पुढे सरकते.
मिरवणुकीवर आशीर्वादरूपी पावसाचा शिडकावा होतोच... चौक गुलालाने न्हाऊन निघतात... साऱ्यांच्या चेहऱ्यांना गुलाल माखलेला.. प्रत्येक गल्ली-बोळात वाद्यांसह ‘चांगभलं’चा गजर घुमतो. बैलगाड्यांच्या ताफ्यासह भागातून सवाद्य मिरवणूक फिरते... परिसरातील देवी-देवतांना नवं पाणी अर्पण केलं जातं... नव्या पाण्याचे कलश घेतलेल्या सुवासिनींचं पावलोपावली औक्षण होतं. भागात कासवगतीने सरकणारी मिरवणूक पुढे शहराच्या वेशीवर असणाऱ्या टेंबलाई (त्र्यंबोली) मंदिरापर्यंत पोहोचते... शहरातील इतर भागांतूनही आलेल्या मिरवणुका एकत्र आल्याने टेंबलाईचा डोंगर भक्तांंनी फुलतो. सुवासिनींच्या डोक्यावरून आणलेलं पाणी देवीच्या चरणांवर अर्पण करून धार्मिक अधिष्ठान दिलं जातं. देवीला गोडा, खारा म्हणजेच मांसाहारी आणि अंबील-घुगऱ्यांचा नैवेद्य दाखविला जातो. ‘सुखसमृद्धी येऊन दे, नव्या पाण्यातून शेती फुलू दे’ असं साकडं देवीला घातलं जातं... घुगऱ्या आणि अंबिलीचा प्रसाद वाटप करून सायंकाळी सारे घरी परततात.

Web Title: A new water john in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.