नवे कुलगुरू, नवी टीम

By Admin | Updated: February 3, 2015 00:57 IST2015-02-03T00:57:43+5:302015-02-03T00:57:43+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अगोदर नवीन पूर्णवेळ कुलगुरू मिळणार की पूर्णवेळ ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) व ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

New Vice Chancellor, Navi Team | नवे कुलगुरू, नवी टीम

नवे कुलगुरू, नवी टीम

नागपूर विद्यापीठ : ‘सीओई’, ‘एफओ’, कुलसचिवांची निवड नंतरच
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अगोदर नवीन पूर्णवेळ कुलगुरू मिळणार की पूर्णवेळ ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) व ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत नवीन कुलगुरूंची निवड होणे अपेक्षित आहे. त्यामुळे नवीन कुलगुरूंनाच रिक्त पदांवर नवीन व्यक्तींची निवड करू द्यावी असा प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यामुळे ‘नवा गडी, नवा राज’प्रमाणेच नवीन कुलगुरूंच्या निवडीनंतरच नवीन ‘टीम’ तयार करण्यात येईल अशी दाट शक्यता आहे.
डॉ.विलास सपकाळ यांनी मागील वर्षी मार्च महिन्यात राजीनामा दिल्यापासून विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरूंची प्रतीक्षा आहे. सपकाळ यांच्यानंतर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्यात आला होता.
शंभरावा दीक्षांत समारंभ झाल्यानंतर ही जबाबदारी डॉ.विनायक देशपांडे यांना देण्यात आली. डिसेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी समितीची घोषणा करण्यात आली. ६ फेब्रुवारीपर्यंत कुलगुरुपदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
या समितीची बैठक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई येथे होणार आहे. महिनाअखेरीस साधारणत: २० उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल व यातील पाच चांगल्या उमेदवारांची नावे राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुलपती या उमेदवारांच्या मुलाखती घेतील व त्यानंतर साधारणत: आठवड्याभरात नवीन कुलगुरूंच्या नावाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
‘सीओई’, ‘एफओ’साठी प्रतीक्षा
विद्यापीठाचे पूर्णकालीन ‘सीओई’ व ‘एफओ’ यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून लवकरच पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील असे आश्वासन प्रभारी कुलगुरूंनी शनिवारी दिले. परंतु नवीन कुलगुरूंच्याच अध्यक्षतेखाली ही निवड व्हावी असा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा विचार आहे. त्यामुळे कुलगुरू निवडीनंतरच ‘सीओई’ व ‘एफओ’ची निवड होण्याची शक्यता आहे. ‘सीओई’ पदासाठी १२ तर ‘एफओ’ पदासाठी ६ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. ‘सीओई’ पदासाठी तर दुसऱ्यांदा जाहिरात देण्यात आली आहे. याअगोदर सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या मुलाखतींदरम्यान एकही उमेदवार पात्र नसल्याचा निर्वाळा निवड समितीतर्फे देण्यात आला होता.
कुलसचिव पदासाठी जाहिरात
वरिष्ठ पदांपैकी कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे हेच पूर्णकालीन अधिकारी आहेत. परंतु त्यांनीदेखील प्रशासनाला पद सोडत असल्याची माहिती दिली असून ३१ मार्च रोजी ते पदावरून पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर तत्काळ पूर्णवेळ अधिकाऱ्याची निवड व्हावी याकरिता विद्यापीठाकडून कुलसचिव पदासाठी जाहिरात देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांकडून २ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. साधारणत: १३ एप्रिलपर्यंत पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘प्रभारी’ भरोसेच होणार १०१ वा दीक्षांत
शंभराव्या दीक्षांत समारंभाप्रमाणेच नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभदेखील प्रभारी अधिकाऱ्यांच्याच भरवशावर होणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अशोक गोमाशे वगळता इतर कोणतेही मोठे अधिकारी पूर्णकालीन नाहीत.

Web Title: New Vice Chancellor, Navi Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.