नव्या सिमची ‘नऊ’लाई लवकरच अवतरणार
By Admin | Updated: May 8, 2015 04:42 IST2015-05-08T04:42:40+5:302015-05-08T04:42:40+5:30
सध्या दोन मोबाइल क्रमांक हवे असतील तर दोन सिम कार्ड खरेदी करावी लागतात. परंतु एकाच सिम कार्डावर एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ मोबाइल नंबर चालतील असे तंत्रज्ञान

नव्या सिमची ‘नऊ’लाई लवकरच अवतरणार
मुंबई : सध्या दोन मोबाइल क्रमांक हवे असतील तर दोन सिम कार्ड खरेदी करावी लागतात. परंतु एकाच सिम कार्डावर एक-दोन नव्हे, तर तब्बल नऊ मोबाइल नंबर चालतील असे तंत्रज्ञान विकसित होत असून, चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत ते भारतीय बाजारात येणार आहे.
मोबाइल हँडसेट क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्लॅकबेरीतर्फे हे क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित होत आहे. ‘व्हर्च्युअल सिम प्रोव्हिजनिंग’ ही संकल्पना नवी नसली तरी आजवर केवळ हे तंत्रज्ञान कागदावरच मांडले गेले.
कंपनीने हे विकसित केले असून, याच्या तांत्रिक तपासण्या सध्या सुरू आहेत. हे तंत्रज्ञान बाजारात आल्यानंतर मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आणि मोबाइल हँडसेट अशा मोबाइल बाजारपेठेत लक्षणीय बदल होतील; तसेच काही नवी व्यवस्थाही विकसित होईल.
मोबाइल कंपन्यांच्या संघटनेने गेल्या नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या एका जागतिक सर्वेक्षणानुसार, एकापेक्षा जास्त मोबाइल क्रमांक बाळगण्याचा ट्रेंड भारतामध्ये वाढीला लागत असून, १०पैकी किमान ४ लोकांकडे स्वत:चे दोन क्रमांक आहेत.
पण दोन क्रमांकांसाठी दोन हँडसेट बाळगावे लागू नयेत याकरिता मोबाइल हँडसेट कंपन्यांनी बाजारात आणलेल्या ड्युएल हँडसेटना म्हणजे एका हँडसेटमध्ये दोन सिम कार्ड सामावतील अशा हँडसेटला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतीय बाजारात सध्या महिन्याकाठी ३० लाख ड्युएल हँडसेटची विक्री होते. परंतु, हे तंत्रज्ञान बाजारात आल्यानंतर ड्युएल हँडसेटची गरज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सिंगल सिम मोबाइल हँडसेटची विक्री वाढतानाच त्यातही नवीन आकर्षक फिचर्ससह हँडसेट बाजारात येतील. (प्रतिनिधी)