भारतात ‘लष्कर’ची नवी संघटना?
By Admin | Updated: June 14, 2014 04:31 IST2014-06-14T04:31:00+5:302014-06-14T04:31:00+5:30
अनेक म्होरके आणि सदस्यांच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीन निष्प्रभ झाल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या विचारात

भारतात ‘लष्कर’ची नवी संघटना?
डिप्पी वांकाणी, मुंबई
अनेक म्होरके आणि सदस्यांच्या अटकेमुळे इंडियन मुजाहिदीन निष्प्रभ झाल्याने भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा नवी दहशतवादी संघटना स्थापन करण्याच्या विचारात आहे, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
एवढेच नव्हे तर इंडियन मुजाहिदीनचे प्रशिक्षित दहशतवादी भारतात आपल्या मनाप्रमाणे काम करीत नसल्याचे मत असल्याने लष्कर-ए-तय्यबा मुजाहिदीनच्या आझमगढ गटाच्या दोन डझनांहून अधिक दहशतवाद्यांचा वापर पाकिस्तानमधील फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज (फाटा) मधील वझिरीस्तान प्रांतात लढण्यासाठी करीत आहे, अशी ताजी माहितीही गुप्तहेर संघटनांच्या हाती आल्याचे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या सूत्रांच्या म्हणण्यानुसार यासीन भटखळ, वकास आणि तबरेझ हे तीन महत्त्वाचे हस्तक पकडले गेल्यानंतर इंडियन मुजाहिदीनला बॉम्ब बनवणाऱ्या आणि स्फोटकांची तजवीज व जुळणी करणाऱ्या प्रशिक्षित दहशतवाद्यांची वानवा जाणवत आहे. भारतात दहशतवादी कारवाया करण्यात कमी पडल्याने इंडियन मुजाहिदीनचे पाकिस्तानमधील आश्रयदाते त्यांच्यावर नाराज असून या विषयावरून त्यांनी पाकिस्तानमध्ये असलेला संघटनेचा म्होरक्या रियाझ भटखळ याला चांगलेच धारेवर धरले होते. इतके की, त्याचा मोबाइल फोन आणि अन्य वस्तूही काढून घेण्यात आल्या. मोठ्या प्रमाणात पैसा ओतूनही भारतात पुरेसा हिंसाचार घडवण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सकडून (आयएसआय) त्याला मारहाणही करण्यात आली.
‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने सांगितले की, इंडियन मुजाहिदीनमधील अंतर्गत वादांमुळे मूळ भटखळ या गावच्या
असलेल्या रियाझच्या गटापासून मिर्झा
शाद बेगच्या नेतृत्वाखालील आझमगढ
गटाने फारकत घेतली आहे. सध्या या संघटनेत बेगचा आझमगढ गटच अधिक प्रभावी आहे.