मुंबई : अकरावीच्या पहिल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने गुरुवारी पाचवी गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीसाठी अर्ज केलेल्या एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ६४५ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाले असून केवळ चार विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. तरी शुक्रवारी, ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या विशेष आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत उर्वरित विद्यार्थ्यांसोबत दूरचे महाविद्यालय मिळालेले, शाखा बदल करायचे आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी मिळणार आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, याआधी अर्धवट अर्ज भरलेल्या आणि अर्जच न केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. अशा विद्यार्थ्यांसाठी सोमवारी आणि मंगळवारी नोंदणी सुरू ठेवण्यात आली. एकूण ९ हजार ६४९ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ६४५ म्हणजेच ९९ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ३३५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाले आहेत. तर ७४२ विद्यार्थ्यांना दुसऱ्या आणि २८६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या क्रमांकावरील पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे.प्रवेशापासून वंचित राहिलेल्या चार विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या विशेष आॅनलाइन प्रक्रियेद्वारे प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. या विशेष फेरीत सर्व विद्यार्थ्यांना सामील होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे यापूर्वी दूरच्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागा असलेल्या नजीकच्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. शिवाय ज्या विद्यार्थ्यांना विषय किंवा शाखा बदल करायचा आहे, त्यांनाही या विशेष फेरीमध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या फेरीत सामील होण्यासाठी याआधी घेतलेला प्रवेश रद्द करण्याची गरज नाही. विशेष फेरीत आवडत्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यानंतरच जुन्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (प्रतिनिधी)>विशेष फेरीत सामील होण्यासाठी५ व ६ आॅगस्ट रोजी नवीन लॉगइन आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल.८ व ९ आॅगस्ट रोजी आॅनलाइन पद्धतीने नवीन अर्ज भरता येईल. शिवाय अर्ज भरताना केवळ १० महाविद्यालयांची निवड करायची आहे. महाविद्यालय निवड करताना क्षेत्र किंवा वॉर्डचे बंधन नाही.११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली विशेष फेरी जाहीर होईल.१२ व १३ आॅगस्ट रोजी विशेष फेरीत ज्या महाविद्यालयात नाव निश्चित होईल, तिथे प्रवेश निश्चित करावा लागेल.
आजपासून नवी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया
By admin | Updated: August 5, 2016 01:51 IST