सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजन केले. हा देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची जवळपास ९० फूट इतकी आहे. हा पुतळा पुढील १०० वर्षे कुठल्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल, अशी याची रचना करण्यात आली. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला होता. यानंतर शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत नव्यानं पुतळा उभारला. सार्वजनिक बांधकाम विभागाने विक्रमी वेळेत पुतळ्याचे काम पूर्ण करुन महाराजांच्या कर्तृत्वास साजेसा भव्य पुतळा उभारला. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच यंत्रणांनी अतिशय वेगाने काम केले. ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतारांनी कमी वेळेत आकर्षक आणि देखणा पुतळा साकारला आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
फडणवीस यांची सोशल मीडियावर पोस्ट'या छत्रपती शिवरायांच्या दूरदर्शी विचारांचा साक्षीदार असलेल्या सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आज दर्शन व पूजन करण्याचे सौभाग्य लाभले. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा त्यांचा अद्वितीय पराक्रम आणि सागरी सीमांच्या रक्षणासाठी असणारी त्यांची दूरदृष्टी, याची साक्ष पुढच्या पिढ्यांना देत राहील', अशी पोस्ट फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून केली.
पुतळ्याची वैशिष्ट्ये- ज्येष्ठ मूर्तीकार राम सुतार यांच्या कंपनीमार्फत हे काम पूर्ण.- पुतळा उभारण्यासाठी ३१ कोटी ७५ लाखांचा खर्च.- संपूर्ण पुतळा कांस्य धातूमध्ये उभारण्यात आला.- पुतळ्याच्या आधारासाठी स्टेनलेस स्टील पोर्ट फ्रेमवर्क.- चौथऱ्यासाठी एम५० या उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर.