मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विधेयक विधानसभेत मंजूर
By Admin | Updated: December 23, 2014 16:03 IST2014-12-23T16:03:18+5:302014-12-23T16:03:18+5:30
भाजपा सरकारने मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विधेयक मांडले असून विधानसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विधेयक विधानसभेत मंजूर
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २३ - आघाडी सरकारच्या मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिल्यावर राज्यातील भाजपा सरकारने मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील नवीन विधेयक मांडले असून विधानसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. मात्र नवीन विधेयकात मुस्लिमांचा समावेश न केल्याने विरोधकांनी गोंधळ घातला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने मराठा आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घाईघाईत मंजूर करुन घेतला होता. मात्र कायद्याच्या पटलावर हा निर्णय तग धरु शकला नाही व मुंबई हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिली. सुप्रीम कोर्टानेही मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीसाठी नकार दिल्याने राज्य सरकारला धक्का बसला होता. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचे नवीन विधेयक मांडले. नव्या विधेयकाच्या माध्यमातून सरकारने कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. या विधेयकाला विधानसभेने मंजुरी दिली आहे. फडणवीस यांनी मांडलेल्या विधेयकात मुस्लिम आरक्षणाचा समावेश नसल्याने यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. यामुळे तीन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
----------
राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदी
विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद कोणाकडे जाते याविषयी गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता होती. मंगळवारी विधानसभाध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.