राज्यातील नवीन सरकार दिवाळीनंतरच
By Admin | Updated: October 21, 2014 14:06 IST2014-10-21T11:51:26+5:302014-10-21T14:06:25+5:30
महाराष्ट्रातील भाजपाचे पक्ष निरीक्षक केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असं जाहीर केल्याने महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील नवीन सरकार दिवाळीनंतरच
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - महाराष्ट्रातील भाजपाचे पक्ष निरीक्षक व केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असं जाहीर केल्याने महाराष्ट्रात दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजपाने आघाडी घेतली असली तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. भाजपाला १२२ जागांवर विजय मिळवला असून सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी २२ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच भाजपाला बाहेरुन पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र भाजपाने त्यावर अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेसोबत चर्चा सुरु असल्याचे वृत्त आहे. तर शिवसेनेला सोबत न घेता मनसे, अपक्ष आणि उर्वरित पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यासाठी भाजपाला अथक मेहनत करावी लागणार आहे.
मंगळवारी राज्यातील भाजप आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी पक्ष निरीक्षक राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा मुंबईत येणार होते. मात्र मंगळवारी सकाळी राजनाथ सिंह यांनी दिवाळीनंतरच मुंबईत येऊ असे जाहीर केले. तर भाजप आमदारांची मुंबईत होणारी बैठकही रद्द झाली असून दिवाळी साजरी करण्यासाठी भाजपचे आमदार स्वगृही रवाना झाले आहेत. त्यामुळे दिवाळीनंतरच सत्ता स्थापन होणार हे स्पष्ट झाले आहे.