नव्या सरकारचे कायदे संविधानविरोधी
By Admin | Updated: March 15, 2015 00:36 IST2015-03-15T00:36:20+5:302015-03-15T00:36:20+5:30
भूसंपादन कायदा, महिलांच्या विषयीचा जर एखादा कायदा असेल तर तो मोडीस काढून त्यांनी दुसरा कायदा तयार केला आहे.

नव्या सरकारचे कायदे संविधानविरोधी
पुणे : नवीन सरकारने संविधानाच्या विरोधी कायदे काढले आहेत. त्यांचे ते पालन करीत आहे. भूसंपादन कायदा, महिलांच्या विषयीचा जर एखादा कायदा असेल तर तो मोडीस काढून त्यांनी दुसरा कायदा तयार केला आहे. अशा वेळी समाजसंस्थेने पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
स्वाधार या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी आपटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘समर्पिता’ या अंकाचे प्रकाशन निवारा सभागृहात शुक्रवारी झाले. या वेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक मीरा बोरवणकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू वंदना चक्रवर्ती, स्वधारच्या अध्यक्षा सरिता भट आदी उपस्थित होत्या. पाटकर म्हणाल्या, ‘समाजात जर एखादा बदल आपल्याला करायचा असेल, तर कायद्याविरोधी काम करणे गरजेचे आहे, तरच आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल, असे मला वाटते. मीनाक्षी आपटे यांनी जे समाजकार्य केले त्याला प्रसिद्धी मिळाली नाही; पण तळागाळातल्या प्रत्येक अज्ञान घटकांसाठी लढल्या. सरकारचे ज्या घटकाकडे दुर्लक्ष झाले, त्यासाठी आपटे या लढत होत्या. समाजकार्य करणाऱ्या अनेक संस्था जर एकत्र आल्या, तरच समाज सुधारू शकतो. बोरवणकर म्हणाल्या, ‘‘शासन, प्रशासन आणि स्वयसेवी संस्था जर एकत्र आल्या, तर देश घडू शकेल.’’
चक्रवर्ती म्हणाल्या, ‘‘मीनाक्षी मॅडम विद्यार्थिनींसोबत मैत्रिणीसारख्या राहिल्या. कोणताही प्रकल्प त्यांनी सुरू केला, तर तो पूर्णत्वाला नेल्याशिवाय त्या शांत बसत नव्हत्या.’’ त्यांच्या आठवणींना या वेळी उजाळा मिळाला. (प्रतिनिधी)