नवविवाहितेचा हुंड्यासाठी खून

By Admin | Updated: September 12, 2014 00:53 IST2014-09-12T00:53:12+5:302014-09-12T00:53:12+5:30

समाज आता पुढारला, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला लग्नात महत्त्व दिले जात नाही. त्याचमुळे हुंडाबळीच्या घटनांना आळा बसल्याची चर्चा आता जाहीरपणे केली जाते. मात्र, या चर्चेत तथ्य नाही.

New-girl blood for dowry | नवविवाहितेचा हुंड्यासाठी खून

नवविवाहितेचा हुंड्यासाठी खून

आधी बेदम मारहाण नंतर विषप्रयोग : वकील नवऱ्यासह तिघे गजाआड
नागपूर : समाज आता पुढारला, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेला लग्नात महत्त्व दिले जात नाही. त्याचमुळे हुंडाबळीच्या घटनांना आळा बसल्याची चर्चा आता जाहीरपणे केली जाते. मात्र, या चर्चेत तथ्य नाही. सधन परिवारातील एका उच्चशिक्षित (वकील) तरुणाने आपल्या नवविवाहित पत्नीचा लग्नानंतर अवघ्या तीनच महिन्यात हुंड्यासाठी निर्घृण खून केला. लकडगंजमधील क्वेट्टा कॉलनीत ही संतापजनक घटना घडली असून, पोलिसांनी मृत विवाहितेचा नवरा, सासू आणि दिराला अटक केली.
सोनाली अमोल बोरकर (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. भांडे प्लॉट नंदनवन येथील रहिवासी शंकरराव जागोबाजी टिपले (वय ५५) यांची ती मुलगी होय. टिपले डेकोरेशन व्यावसायिक आहेत. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यातील सोनाली ही तिसऱ्या क्रमांकाची मुलगी. १७ जून २०१४ ला सोनालीचे क्वेट्टा कॉलनीतील अमोल पांडुरंग बोरकर (वय ३१) या वकिलासोबत थाटामाटात लग्न झाले.
लग्नात टिपले यांनी वर पक्षाला रीतीरिवाजाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भेटवस्तू आणि गोफ, अंगठीसह ५ तोळे सोन्याचे दागिने दिले.
अमोल वकिलीसोबतच शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस) चालवतो. सोनाली ही सुद्धा एमए बीएड् होती. त्यामुळे लग्नानंतर सोनलीसुद्धा पती अमोलसोबत उमिया शंकर शाळेजवळ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जात होती. सर्व काही व्यवस्थित असताना जावई अमोल याने कार घेण्यासाठी सोनालीला माहेरून दोन लाख रुपये मागून आण, असा तगादा लावला. दोन लाख रुपये देण्याएवढी वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे सोनाली पतीची समजूत काढत होती. दरम्यान, ती दोन लाखांची रक्कम (हुंडा) माहेरून आणण्यासाठी टाळत असल्यामुळे सोनालीचा छळ सुरू झाला.
या पार्श्वभूमीवर, ९ सप्टेंबरच्या सायंकाळी ६.३० वाजता शंकरराव टिपले यांना अमोलचा फोन आला. सोनालीची प्रकृती खराब असून, तिला चांडक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यावरून शंकरराव, त्यांची पत्नी कमलाबाई आणि मुलगा सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉस्पिटलमध्ये पोहचले.
वैद्यकीय अहवालातून पाप उघड
हे प्रकरण संशयास्पद वाटत असल्यामुळे ठाणेदार सत्यनारायण जयस्वाल यांनी डॉक्टरांना लगेच वैद्यकीय अहवाल मागितला. तो मिळताच पोलीसही हादरले. वकिली करणाऱ्या अमोलने एखाद्या सराईत गुन्हेगाराला लाजवण्यासारखे कृत्य केल्याचे उघड झाले. त्याने सोनालीच्या डोक्यावर आधी बॅट किंवा फळीचे फटके मारले. ती बेशुध्द झाल्यावर तिच्यावर विषप्रयोग केला. नंतर तिने विष घेतल्याचा कांगावा करून तिला रुग्णालयात दाखल केले. आपले पाप उघड होणार नाही, याची त्याला खात्री होती. मात्र, वैद्यकीय अहवालातून त्याचे पाप चव्हाट्यावर आले. ठाणेदार जयस्वाल यांनी त्याला, त्याच्या भावाला आणि आईला अटक करून त्यांची १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी मिळवली.
प्र्रेयसीसाठी घेतला बळी ?
आरोपी अमोलचे लग्नानंतर एका उच्चभ्रू तरुणीशी अनैतिक संबंध जुळले. त्यामुळे सोनालीचा खून करण्याचे कारस्थान रचल्याची प्राथमिक कबुली दिल्याचे पोलीस सांगतात. सोनालीच्या मृत्यूनंतर पे्रयसीशी घरठाव करण्याची त्याची योजना होती, असेही त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. दरम्यान, एका वकिलाने केलेल्या या निर्दयी कृत्यामुळे पोलीसही हादरले आहे.

Web Title: New-girl blood for dowry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.