ठाणे, नवी मुंबईत नवे ‘उड्डाण’
By Admin | Updated: January 13, 2015 05:31 IST2015-01-13T05:31:24+5:302015-01-13T05:31:24+5:30
मुंबई महानगर प्रदेशातील वाढत जाणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठाणे, नवी मुंबईत दोन नवे फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत

ठाणे, नवी मुंबईत नवे ‘उड्डाण’
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढत जाणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ठाणे, नवी मुंबईत दोन नवे फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत. वाहतूककोंडीने त्रस्त असलेल्या शीळफाटा-महापे रस्त्यावर आणि ठाणे-बेलापूर रस्त्यावरील घणसोली नाका ते तळवली नाका या दरम्यान हे फ्लायओव्हर उभारण्याचा
निर्णय एमएमआरडीने घेतला.
मुंबई महानगर प्रदेशात दोन फ्लायओव्हर, वाहनांसाठी एक भुयारी मार्ग आणि दोन प्रकल्पांसाठी सविस्तर अहवाल प्रकल्प तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. मुख्य सचिव आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीची बैठक सोमवारी पार पडली़ या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.
समितीने पूर्व द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर पूर्व येथील छेडानगर जंक्शन येथे फ्लायओव्हर बांधण्याच्या प्रस्तावाची प्राधिकरणाकडे शिफारस केली. ठाणे-भिवंडी-कल्याण या भागातील वाहतूक सोयी व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज लक्षात घेण्याकरिता तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी कार्यकारी समितीने मंजुरी दिली.
शिवाय नवघर ते चिरनेर या बहुद्देशीय मार्गासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीही कार्यकारी समितीने मंजुरी दिली आहे. हा कॉरिडॉर मुंबईला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. हा कॉरिडॉर मुंबईला राष्ट्रीय महामार्ग ८, भिवंडी बायपास, राष्ट्रीय महामार्ग ३, राष्ट्रीय महामार्ग ४, राष्ट्रीय महामार्ग ४ ब, मुंबई-पुणे एक्सप्रेस, राष्ट्रीय महामार्ग १७ ला जोडेल आणि विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि उरण येथे विकास केंद्र निर्माण करण्यास उपयुक्त ठरणार आहे.
छेडानगरची वाहतूककोंडी सुटणार
कार्यकारी समितीने छेडानगर येथील वाहतूक सुधारणा प्रकल्पाचीही शिफारस प्राधिकरणाकडे केली. या प्रकल्पांमध्ये दोन फ्लायओव्हर आणि एक उन्नत मार्गचा समावेश आहे. पूर्व मुक्त मार्ग आणि सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता येथून वाहने सुसाट येतात. मात्र छेडानगर येथे वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या सोडविण्याकरिता या प्रकल्पाची शिफारस करण्यात आली होती.
सध्या सायन येथे ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या तीन मार्गिकांच्या फ्लायओव्हरला समांतर असा तीन मार्गिकांचा व ६८० मीटर लांबीचा एक फ्लायओव्हर (५६.६६ कोटी) बांधण्यात येईल. नवी मुंबईकडून येणारी वाहने ठाण्याच्या दिशेने जाण्यासाठी दोन मार्गिकांचा व १ हजार २४० मीटर लांबीचा फ्लायओव्हरही (९४.३९ कोटी) बांधण्यात येणार आहे. नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारा हा फ्लायओव्हर सध्याच्या छेडानगर फ्लायओव्हरहून पूर्व द्रुतगती मार्गास जाऊन मिळणार आहे.
शिवाय छेडानगर फ्लायओव्हर आणि अमर महल जंक्शन फ्लायओव्हर यांना जोडणारा ६५० मीटर लांबीचा व दोन मार्गिकांचा उन्नत मार्ग
(५२.२८ कोटी) येथे उभारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)