शीळ भागात आता नवीन अग्निशमन केंद्र
By Admin | Updated: October 20, 2016 03:54 IST2016-10-20T03:54:33+5:302016-10-20T03:54:33+5:30
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन केंद्रात आता आणखी एका नव्या केंद्राची भर पडणार आहे.

शीळ भागात आता नवीन अग्निशमन केंद्र
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अग्निशमन केंद्रात आता आणखी एका नव्या केंद्राची भर पडणार आहे. शीळ भागात नव्याने अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. मुंब्रा, कौसा, दिवा या भागांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, या भागात मुंब्य्रामध्येच अग्निशमन केंद्र आहे. परंतु, ते पुरेसे ठरत नसल्याने आता हे नवीन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी शीळफाटा परिसरात स्वतंत्र इमारत उभारणार असून त्यामध्ये अग्निशमन कार्यालयासह अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय राहणार आहे. या नव्या इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन जवानांची लवकर मदत मिळणे शक्य होणार आहे. याशिवाय, वागळे इस्टेट भागातील अग्निशमन केंद्राची आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत धोकादायक झाल्यामुळे त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. शीळफाटा आणि वागळे या दोन्ही इमारतींत व्यायामशाळेचीही सोय राहणार आहे.
ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये घोडबंदर, मुंब्रा, कौसा तसेच दिवा ही शहरे आघाडीवर आहेत. ठाणे शहरापासून जवळच असलेल्या घोडबंदर भागातील नागरिकांना पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या आहेत. त्या तुलनेत मात्र मुंब्रा, कौसा तसेच दिवा परिसरात महापालिकेला सोयीसुविधा पुरवणे शक्य होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून या तिन्ही परिसरांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्याकडे महापालिका प्रशासनाने विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या तिन्ही भागांसाठी नवे अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शीळफाटा परिसरातील २४२९ चौरस मीटर जागेमध्ये हे नवे केंद्र उभारले जाणार आहे.
यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून त्यामध्ये नव्या इमारतीत अग्निशमन केंद्र तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात येणार आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर फायर इंजीनकरिता चार पोर्च, नियंत्रण कक्ष, कॉमन रूम, पहिल्या मजल्यावर व्यायामशाळा, स्वतंत्र रिक्रेशनल रूम, दुसऱ्या मजल्यावर कार्यालय, विभागीय व स्थानक अधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. याशिवाय, बैठक व प्रशिक्षण सभागृह तसेच प्रसाधनगृह अशा सोयीसुविधा राहणार आहेत. या कामासाठी तीन कोटी ८३ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
>पाच कोटी १८ लाखांचा खर्च अपेक्षित
वागळे इस्टेट भागातील अग्निशमन केंद्राची आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत धोकादायक झाली आहे. त्यामुळे ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या इमारतीत तळखोलीत मुख्य स्टोअर रु म, तळ मजल्यावर फायर इंजीनकरिता तीन पोर्च, नियंत्रण कक्ष, कॉमन रूम, पहिल्या मजल्यावर व्यायामशाळा, स्वतंत्र रिक्रिएशनल रूम, दुसऱ्या मजल्यावर कार्यालय, विभागीय व स्थानक अधिकारी कार्यालयासाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे.
याशिवाय, बैठक आणि प्रशिक्षण सभागृह उभारले जाणार आहे. या कामासाठी पाच कोटी १८ लाखांचा खर्च अपेक्षित असून यासंदर्भातील प्रस्ताव गुरुवारच्या महासभेत पटलावर मंजुरीसाठी ठेवले आहेत.