भाजपा-कलानी युतीचा नवा अध्याय
By Admin | Updated: February 14, 2017 00:52 IST2017-02-14T00:52:02+5:302017-02-14T00:52:02+5:30
आजवर राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल नाकाने कांदे सोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उल्हासनगरात कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी

भाजपा-कलानी युतीचा नवा अध्याय
सदानंद नाईक/पंकज पाटील / उल्हासनगर
आजवर राजकारणाच्या गुन्हेगारीबद्दल नाकाने कांदे सोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाने उल्हासनगरात कुख्यात पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांच्यासोबत युती केल्याने या पक्षाचे कथित सोवळे गळून पडले आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने लिहिला गेलेला गुन्हेगारीकरणाचा नवा अध्याय, भविष्यात भाजपाला कुठे घेऊन जातो, हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे.
भाजपा-कलानी ही अनैसर्गिक युती असल्याने, त्यामध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळे ओमीचे उमेदवार स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते, पण भाजपाने त्यांना ‘कमळ’ चिन्हावर लढण्यास भाग पाडून भविष्यातील राजकीय तडजोडीचा वाव ठेवला नाही. भाजपाचे उल्हासनगरातील नेते कुमार आयलानी यांचा ओमी यांना सोबत घेण्यास विरोध होता. मात्र, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व अन्य काही नेते कलानी यांना भाजपात आणण्याकरिता उत्सुक होते. ‘कलानी म्हणजे उल्हासनगर’ हे समीकरण पप्पू कलानी जेलमध्ये गेल्याने विस्कटले. आता ओमी यांना पत्नी पंचम कलानी यांना महापौरपदी बसवून गमावलेली सत्ता काबीज करायची आहे. लागलीच भाजपातील कलानीविरोधी गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे या अंतर्विरोधाचा भाजपाला फटका बसू शकतो. रामदास आठवले यांच्या रिपाइंने इथे शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली आहे.
महापालिकेत आतापर्यंत शिवसेना, भाजपा, रिपाइं व साई या पक्षांची सत्ता होती. उल्हासनगर हे भीषण पाणीटंचाई, अस्वच्छता, बेकायदा बांधकामे, सार्वजनिक वाहतुकीचा अभाव अशा असंख्य समस्यांचे आगार आहे. साहजिकच, त्यामुळे शिवसेनेबद्दल अँटी इन्कम्बन्सी आहे. भाजपाने कलानींसोबत हातमिळवणी केल्याने, शिवसेनेनेही सिंधी कार्ड खेळले आहे. सिंधी उमेदवार रिंगणात उतरवण्याबरोबर विभागीय मेळावे सिंधीबहुल परिसरात घेतले.