सराफा बाजाराला नवी झळाळी

By Admin | Updated: April 22, 2015 04:17 IST2015-04-22T04:17:36+5:302015-04-22T04:17:36+5:30

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लयलूट करण्यासाठी मंगळवारी सराफा दुकानांत एकच झुंबड उडाली होती. सोन्याच्या भावात

New bullion in bullion market | सराफा बाजाराला नवी झळाळी

सराफा बाजाराला नवी झळाळी

चेतन ननावरे, मुंबई
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लयलूट करण्यासाठी मंगळवारी सराफा दुकानांत एकच झुंबड उडाली होती. सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीचा फायदा घेत देशात खरेदीदारांनी ३० टन सोन्याची लयलूट केल्याची माहिती ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिली.
जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ मुंबईतील सराफा बाजार सायंकाळपर्यंत ३०० कोटींच्या घरात गेला होता. त्यात सोने, चांदीसह हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश होता. दिवसभर खरेदीदारांनी दुकानांत गर्दी केली होती. दिवसभराचा मुहूर्त आणि कडक ऊन असतानाही सोने खरेदीसाठी दुपारच्या वेळीही ग्राहकांनी रीघ लावली होती. सायंकाळनंतर तर दागिने खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला.
याउलट गृह खरेदीकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे बिल्डर असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष आनंद गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता म्हणाले की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रशासकीय धोरणांचा फटका मुंबईतील विकासकांना बसला. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केडीएमसीमधील घरखरेदीला चाप लागला. त्याचा फायदा नवी मुंबईतील विकासकांना झाला.
कारण मुंबई आणि केडीएमसीमधील घरांना पर्याय म्हणून बहुतांश ग्राहकांनी नवी मुंबईत गृहखरेदी करण्यास पसंती दर्शवली. नेहमीच्या मानाने आजच्या दिवशी झालेल्या गृह खरेदीच्या आकड्यात वाढ झाली असली, तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती समाधानकारक नसल्याची खंत गुप्ता यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: New bullion in bullion market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.