रंगभूमीसाठी नवीन कलाकार हवेत : देशपांडे
By Admin | Updated: November 5, 2014 00:08 IST2014-11-04T21:24:05+5:302014-11-05T00:08:00+5:30
अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.

रंगभूमीसाठी नवीन कलाकार हवेत : देशपांडे
उत्तमकुमार जाधव- चिपळूण -गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी मराठी रंगभूमीवरील नाट्य चळवळ काहीशी थंडावलेली दिसते. दूरदर्शनवरील नवीन मालिकांमुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन होत आहे. त्यामुळे नाट्यगृहात जाऊन नाटक बघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कोकण ही खऱ्या अर्थाने कलावंतांची भूमी असून, या भूमीतील कलाकारांनी रंगभूमीसाठी प्रचंड योगदान दिले आहे. मराठी रंगभूमीसाठी नवीन कलाकार निर्माण व्हायला हवेत, अशी अपेक्षा साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी व्यक्त केली.
गणपतराव जोशी, केशवराव दाते, मामा पेंडसे, शंकर घाणेकर, काशिनाथ घाणेकर, मच्छींद्र कांबळी अशा प्रदीर्घ कलावंतांनी मराठी रंगभूमीसाठी योगदान दिले आहे. आजही वैभव मांगलेंसारखा कलाकार रंगभूमी गाजवताना दिसतो. कोकणात नाटक हे नुसते मनोरंजनाचे साधन नव्हे; तर ती ईश्वरसेवा म्हणून सादर केली जाते आणि ही सेवा करण्यासाठीच कोकणच्या मातीत अनेक कलाकार घडतात. बदलत्या युगातही ग्रामीण भागात आजही देवांचे उत्सव होतात. त्यावेळी लळीतप्रसंगी नाटक सादर केले जाते. जशी कलावंतांची परंपरा आहे, तशीच नाट्यलेखकांची, संगीतकारांची परंपरा आहे, असे देशपांडे म्हणाले.
वसंत देसाई, राम मराठे, गोविंदराव पटवर्धन अशी दिग्गज मंडळी नाट्यसंगीत क्षेत्रात गाजली. वसंत जाधव यांनी लिहिलेली नाटके खेडोपाडी आजही होतात. त्याचे शेकडो प्रयोग झाले. चिपळूणमध्ये असणारे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र बंद पडले. तीच स्थिती आज कोकणातील अन्य शहरांची आहे. सुसज्ज असे नाट्यगृह नाही. वाढती महागाई, तिकिटांचे दर सामान्यांच्या खिशाला न परवडणारे आहेत. त्यामुळे ही चळवळ काहीशी थंडावलेली आहे. तरीही न थांबता, न थकता इथले कलाकार घेतला वसा न टाकता सांभाळत आहेत. रत्नागिरीतील खल्वायनसारखी संस्था संगीत नाटकांचे प्रयोग सादर करताना दिसते. अनिल दांडेकरांसारखा लेखक प्रायोगिक रंगभूमीवर प्रयोग सादर करीत आहे. या पंखांना नटराजाबरोबरच आम्हा सर्व रसिकांनी भक्कम बळ दिले, तर पुन्हा कोकण प्रांतात खेडोपाडी झापांच्या थिएटरात रात्र रात्र प्रयोग रंगतील, असे देशपांडे म्हणाले.
युवक - युवतीही उत्साहाने एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेऊन स्पर्धा उत्साहपूर्वक होतील. यातूनच नवीन कलाकार निर्माण होतील. यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. सध्या काहीशी ही चळवळ मंदावली असली तरी ती थांबणार नाही. असा विश्वास वाटतो, असे देशपांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.