सलोख्याचा नवा करार!
By Admin | Updated: February 1, 2015 03:00 IST2015-02-01T03:00:02+5:302015-02-01T03:00:02+5:30
समुद्रकिनाऱ्यावरचं गाव. हिंदू आणि मुस्लीम अशी दोन्ही समाजांची वस्ती. १९८७ साली काही कारणावरून तेढ निर्माण झाले आणि या दोन समाजांत दंगल झाली.

सलोख्याचा नवा करार!
गावाने केली आचारसंहिता : संवेदनशील बुरोंडीचा पुरोगामी निर्णय
शिवाजी गोरे - दापोली
समुद्रकिनाऱ्यावरचं गाव. हिंदू आणि मुस्लीम अशी दोन्ही समाजांची वस्ती. १९८७ साली काही कारणावरून तेढ निर्माण झाले आणि या दोन समाजांत दंगल झाली. तेव्हापासून गाव संवेदनशील म्हणून नोंदलं गेलं. दोन्ही समाजांत अधूनमधून कुरबुरी सुरूच होत्या. त्याचे परिणाम दोन्ही बाजूंच्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोगायला लागले आणि त्या वेदनेतूनच उदय झाला तो एका नव्या सामाजिक कराराचा. दोन्ही समाजांनी एकत्र येत यापुढे एकोप्याने नांदण्यासाठी एक आचारसंहिता तयार केली अन् ती १०० वर्षे पाळण्याचा लेखी करारही केला़ जातीय सलोख्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारं हे गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी (ता़ दापोली).
बुरोंडी तसं डोंगरकपारीतील दाट लोकवस्तीचं गाव. गावात १९८७ साली हिंदू कोळी बांधवांची वरात मशिदीसमोरून जात असताना वरातीसमोर नाचण्यावरून दोन्ही समाजांत दंगल उसळली. या घटनेमुळे गावात धार्मिक तेढ निर्माण झाले. बुरोंडीचे सामाजिक कार्यकर्ते कै. युसूफभाई मस्तान आणि हिंदू पंचक्रोशी अध्यक्ष प्रदीप सुर्वे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही बाजंूच्या लोकांची मने जुळविण्याचा प्रयत्न केला. त्याला तब्बल दोन वर्षे लागली. त्यानंतर हा वाद गावातील बैठकीत सामोपचाराने मिटविण्याचा निर्णय झाला. दोन्ही समाजांनी आपल्या चुका कबूल केल्या. तडजोडनामा कोर्टात सादर करून वाद मागे घेण्यात आला. त्यानंतर काही काळ गाव शांत होते; पण अधूनमधून छोट्या छोट्या घटना घडत होत्या़
२०१२ साली मशिदीसमोरील मोकळ्या जागेत गोविंदाची तिसरी फेरी सुरू असताना मुस्लीम तरुणाने हल्ला चढविला. त्यामुळे दोन्ही समाजांतील वातावरण चांगलेच तापले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
या प्रकाराचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटण्याआधी पोलिसांनी गावात समन्वय समिती नेमली. या समितीच्या माध्यमातून हिंदू धर्मातील गोविंदा, गणपती, गौरी, ईद, इफ्तार पार्टी, उरूस, इत्यादी सण-उत्सव शांततेत साजरे करण्याचा निर्णय झाला. २०१२च्या घटनेनंतर बुरोंडीचे सरपंच प्रदीप राणे यांनी इफ्तार पार्टीची प्रथा सुरू करून दोन्ही समाजांचीे मनं जुळविण्याचा प्रयत्न सुरू झाला़
नोव्हेंबर २0१४ मध्ये समन्वय समितीच्या बैठकीत सामाजिक सलोख्यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय झाला़ त्यानुसार मसुदा तयार करून त्यावर सर्व धर्मांतील प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या झाल्या अन् तो मसुदा १०० वर्षांसाठी लागू करण्यात आला. त्याच्या नोटरी केलेल्या प्रती सर्वांकडे ठेवण्यात आल्या आहेत.
गावातील दोन्ही घटनांमुळे हे संवेदनशील गाव म्हणून गणले जाऊ लागले. गावाला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी आणि दोन्ही धर्मीयांचे मनोमिलन करण्यासाठी २०१२ पासून मुस्लीम बांधवांना इप्तार पार्टीची प्रथा गावात सुरू केली व दोन्ही समाजांचे मनोमिलन व्हायला सुरुवात झाली.
- प्रदीप राणे, सरपंच
जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना चपराक बसावी, बुरोंडी गावचा आदर्श देशाने घेतल्यास दोन्ही धर्मीयांतील सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल. दोन्ही धर्मीयांतील पुढील पिढी आमचा आदर्श नक्की घेईल.
- प्रदीप सुर्वे, अध्यक्ष, समन्वय समिती
हा करार म्हणजे दोन्ही समाजांसाठी शांतीचे शुभ प्रतीक आहे. काही किरकोळ गैरसमजांमधून मतभेद होतात. हे मानवतेला काळिमा फासणारे आहे. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणीही असाच आदर्श घेऊन आचारसंहिता तयार केली जावी व त्याचे पालन केले जावे.
- महंमद साब दिवेकर
अशी आहे आचारसंहिता़़़
च्जातीय सलोख्याच्या आचारसंहितेची नोटरी करण्यात येऊन त्याच्या प्रती सर्वांकडे ठेवण्यात आल्या आहेत.
च्हिंदू मिरवणुका, लग्न, गणपती उत्सव, पालखी या मशिदीजवळून जाताना वाजतगाजत जातील. परंतु नमाज चालू असेल तर नमाज होईपर्यंत कोणतीही मिरवणूक ठरावीक अंतरावर थांबेल, नमाज संपल्यानंतर पुढे जाईल.
च्मुस्लीम समाजाच्या उरसाला मारुती मंदिर ते करजगाव दर्गा यामध्ये हिंदू समाजबांधव सहकार्य करतील.
च्गोविंदा प्रथेप्रमाणे मशिदीजवळून नाचत जाईल, मात्र मशिदीसमोर अल्लाला मानवंदना म्हणून केवळ एकच फेरी मारेल.
च्दोन्ही धर्मीयांचे सण एकोप्याने साजरे केले जातील. त्यासाठी कोणत्याही सणात दोन्ही बाजूंच्या समाजांनी एकमेकांना सहभागी करून घ्यायचे आहे.
च्गावातील कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दोन्ही समाजांतील लोकांना निमंत्रित केले जाईल आणि मानसन्मान दिला जाईल.