कधीही तत्त्वाशी तडजोड नाही!

By Admin | Updated: June 19, 2015 04:47 IST2015-06-19T04:47:09+5:302015-06-19T04:47:09+5:30

शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे आणि त्या सुवर्णकाळाबद्दल बोलताना पुस्तकाची पानेच्या पाने संपतील, परंतु घटना संपणार नाहीत.

Never compromise with the principle! | कधीही तत्त्वाशी तडजोड नाही!

कधीही तत्त्वाशी तडजोड नाही!

- मनोहर जोशी, शिवसेना नेते


उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रे काही वर्षांपूर्वी स्वीकारली आणि मागील निवडणुकीत शिवसेनेचे ४५ तर यंदाच्या निवडणुकीत ६३ आमदार निवडून आणले. विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती व्हायला हवी होती. परंतु ती झाली नाही. युतीमध्ये मधेमधे मतभेद डोकावतात. दोन्ही पक्षांत गुण-दोष आहेत. मात्र सत्ता टिकली तरच पुन:पुन्हा सत्ता येते हे लक्षात घेतले पाहिजे.

शिवसेना सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे आणि त्या सुवर्णकाळाबद्दल बोलताना पुस्तकाची पानेच्या पाने संपतील, परंतु घटना संपणार नाहीत. १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली व एप्रिल १९६७ साली मी शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून शिवसेना जवळून पाहण्याची संधी मला लाभली. बाळासाहेबांचा मी आवडता शिवसैनिक असल्याने अनेक छोट्या-मोठ्या घटना मी जवळून पाहिल्या. शिवसेना याच विषयावर मी डॉक्टरेट मिळवली. तत्पूर्वी माझे एम.ए., एल.एल.बी.पर्यंतचे शिक्षण झाले होते. परंतु डॉक्टरेट मिळणे आणि ती माझ्या आवडीच्या विषयात हा माझ्या शैक्षणिक कारकिर्दीचा परमोच्च बिंदू होता. शिवसेनाप्रमुखांनी ही संघटना स्थापन केली, वाढवली व तिला सत्तेपर्यंत नेले. मात्र बाळासाहेबांनी कधीही तत्त्वाशी प्रतारणा केली नाही. सत्तेचे एखादे पद आपल्याला मिळावे, आपण मुख्यमंत्री किंवा लोकसभा अध्यक्ष व्हावे ही कल्पना कधीच त्यांच्या मनाला शिवली नाही. शिवसैनिकांवर भरभरून प्रेम करणारा, त्यांच्यामध्ये शौर्याचे बीज पेरणारा हा नेता होता.
बाळासाहेबांची नाशिकला जाहीर सभा होती. मी त्यांच्याबरोबर तेथे गेलो होतो. इकडे माझी कन्या अस्मिता अचानक आजारी पडली. प्रचंड गर्दीत साहेबांची सभा पार पडली. सभा संपताच मी आमचा मुक्काम असलेल्या पटवर्धन यांच्या घरी गेलो आणि परतण्याकरिता आवराआवर करू लागलो. त्या वेळी रात्रीचे अकरा वाजले होते. तेवढ्यात बाळासाहेब आले आणि मला म्हणाले ‘पंत, कुठे निघालात?' ‘मुलगी आजारी असून मला तातडीने निघायला लागेल', हे मी त्यांना सांगताच ते मला म्हणाले की, मीही तुमच्याबरोबर मुंबईला येणार. मी त्यांना म्हटलो की, ‘साहेब, रात्रीचे अकरा वाजलेत. मुंबईत पोहोचेपर्यंत पहाट होईल. तुम्ही विश्रांती घ्या. मी तुम्हाला रात्री त्रास देऊ इच्छित नाही.' परंतु माझा एकही शब्द न ऐकता बाळासाहेबांनी परतीचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत दाखल होताच त्यांनी माझ्या मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. वर ‘तुमची मुलगी म्हणजे माझी कुणीच नाही का?' असा सवाल केला. आजच्या काळात असा नेता भेटतो का?
एकदा शेकापच्या दि. बा. पाटील यांनी शिवसेनेला मदत म्हणून एक हजार रुपयांचा धनादेश पाठवला होता. परंतु त्यांच्यावर टीका करून तो धनादेश फाडून टाकला. बाळासाहेबांचा हा बाणा पाहून शिवसैनिकांनी घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. महाराष्ट्रात आम्ही मराठी पण हिंदुस्थानात हिंदू आहोत ही त्यांची ठाम धारणा होती.

युवाशक्तीला प्रोत्साहन
ठाण्यातील गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, डोंबिवलीचं सावित्रीबाई फुले नाट्यगृह, कल्याणचं आचार्य अत्रे रंगमंदिर यांसारखे सांस्कृतिक मानबिंदू असोत, दादोजी कोंडदेव स्टेडियमसारखं खेळाचं मैदान आणि त्यावरील अ‍ॅथलेटिक्सच्या सुविधा, मारोतराव शिंदे तरणतलावासारखा आॅलिम्पिक दर्जाचा तरण तलाव, ठाण्याचं भूषण असलेलं सेंट्रल मैदान, डोंबिवलीचं क्रीडासंकुल यांसारख्या सुविधांच्या माध्यमातून क्रीडापटूंच्या अंगभूत गुणांना वाव देऊन युवाशक्तीला प्रोत्साहित करण्याचं कामही शिवसेनेनं अविरत केलं. पं. राम मराठे संगीत समारोहाच्या माध्यमातून अभिजात संगीताची मेजवानी गेली कित्येक वर्षं ठाणेकरांना मिळत आहे.

वारसा पुढे सुरू आहे
कुठल्याही संस्थेच्या अथवा राजकीय पक्षाच्या वाटचालीत ५० वर्षं हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. लोकांनी इतकी वर्षं सातत्याने एखाद्यावर प्रेम करणं ही विलक्षणच गोष्ट म्हटली पाहिजे. शिवसेना कायम या प्रेमाच्या ऋणात राहू इच्छिते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे बाळासाहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळेच आज सत्तेत असतानाही लोकांच्या हिताची भूमिका घेताना शिवसेना कचरत नाही. मी स्वत: उद्धवजींच्या आदेशानुसार दुष्काळ आणि अवकाळी पावसाने होरपळणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि सरकारला मदतीचं पॅकेज जाहीर करायला भाग पाडलं होतं.

युवाशक्तीला विधायक वळण
आज आदित्य ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेची तिसरी पिढी राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय झाली आहे. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहेत. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आज सिनेटमध्येही युवा सेना प्रभावी भूमिका बजावत आहे. ही तरुणाईच देशाची भावी पिढी आहे आणि तिच्याच हातात देशाचं भवितव्य आहे, हे ओळखून आदित्य ठाकरे यांनी या युवाशक्तीला विधायक वळण देण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. जनतेच्या प्रश्नांसमोर शिवसेना सत्तेला महत्त्व देत नाही. जिथे जिथे जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याची वेळ येईल, तिथे शिवसेना अशी भूमिका घेण्यास मागेपुढे बघणार नाही.

Web Title: Never compromise with the principle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.