नेटबॉलपटू मयूरेशचा समुद्रात बुडून मृत्यू
By Admin | Updated: February 3, 2015 02:28 IST2015-02-03T02:28:22+5:302015-02-03T02:28:22+5:30
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा (मूळचा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार समुद्रात याचा बुडून मृत्यू झाला.

नेटबॉलपटू मयूरेशचा समुद्रात बुडून मृत्यू
धक्का : साताऱ्याला आणणार मृतदेह
थिरुअनंतपूरम : येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा (मूळचा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार समुद्रात याचा बुडून मृत्यू झाला. २० वर्षांचा मयूरेश सोमवारी येथील षणमुगम बीचवर संघासह फोटो काढण्यासाठी गेला होता
वेल्लायानी येथे असलेल्या इनडोअर स्टेडियममध्ये सोमवारी सकाळी महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा सामना चंदिगडविरुद्ध होता. या लढतीत महाराष्ट्राचा संघ ०-५ गुणांनी पराभूत झाला. सामना संपल्यानंतर संघाचे खेळाडू तेथे असलेल्या बीचवर फोटो काढण्यासाठी गेले होते. तेथे मयूरेश समुद्रात बुडाला. त्याला लगेच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तेथे पुरेशा सुविधा नसल्यामुळे त्याला दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलकडे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात होते. मयूरेशचे पार्थिव मंगळवारी सकाळी ९ वाजता विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. तिथून ते मायणीत नेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
मयूरेश सलग आठ-नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळला आहे. त्याचे वडील मायणी अर्बन बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. धाकटा भाऊ आकाश याचे विटा (ता. खानापूर) येथे डिप्लोमाचे शिक्षण सुरूआहे.
या प्रकारामुळे संघातील सर्व खेळाडू व अधिकाऱ्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. नेटबॉल संघाचे खेळाडू तर अजूनही स्वत:ला सावरू शकले नाहीत.
- अॅड. धनंजय भोसले, महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख