इस्लामपुरात स्वच्छ भारत अभियानाचा निव्वळ फार्स
By Admin | Updated: November 16, 2014 23:35 IST2014-11-16T22:53:30+5:302014-11-16T23:35:36+5:30
घाणीचे साम्राज्य : कायमस्वरुपी स्वच्छतेच्या यंत्रणेची मागणी; ठेकेदारांचे सफाई कर्मचारी फिरकत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

इस्लामपुरात स्वच्छ भारत अभियानाचा निव्वळ फार्स
अशोक पाटील - इस्लामपूर --माजी मंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा अभियान राज्यभरात राबवले. यासाठी मोठ्या रकमेची बक्षिसेही होती. तरीसुध्दा इस्लामपूर शहरात घाणीचे साम्राज्य कायम होते. सध्याचीही परिस्थिती तशीच आहे. केंद्र सरकारने संत गाडगेबाबा अभियानाला खो देऊन आता स्वच्छ भारत अभियान सुरू केले आहे. इस्लामपूर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीलाही या अभियानाचा साक्षात्कार झाला आहे. त्यांनी केवळ प्रसिध्दीसाठी प्रभागनिहाय स्वच्छता अभियानाचा फार्स केला आहे.
मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा उपक्रम इस्लामपूर पालिकेने राबविण्याचे ठरवले आहे. १४ ते २0 नोव्हेंबरअखेर हा उपक्रम प्रत्येक प्रभागातून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षप्रतोद विजय पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष अॅड. चिमण डांगे, मुख्याधिकारी नीलेश देशमुख आणि काही नगरसेवकांनी हातात खोरे घेऊन गेल्या २५ वर्षांपासून साचलेली घाण उपसण्यास सुरुवात केली आहे. हे नेते केवळ छायाचित्र काढेपर्यंत नाला साफ करण्याचा फार्स करीत आहेत, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून आहे.
सर्वसामान्यांच्या मते केवळ एक दिवसाचा उपक्रम राबवून शहरातील स्वच्छता होणार नाही. यासाठी दररोज पालिकेने स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात साठलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे. यातूनच डेंग्यूसारख्या साथीने थैमान घातले आहे. काही प्रभागातील गटारी वर्षानुवर्षे तुंबल्या आहेत. स्वच्छता ठेकेदाराचे कर्मचारी सफाईसाठी फिरकतही नाहीत. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या गटारी तुंबून त्यातील पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. सत्ताधारी भुयारी गटारींची भाषा करत आहेत. त्या अंमलात कधी येणार? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्यात राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोदींच्या या अभियानाचा पुळका राष्ट्रवादीला आल्याचे दिसते, अशीही भावना काही नागरिकांनी व्यक्त केली.
शहर स्वच्छतेस शुक्रवारपासून प्रारंभ..!
पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांच्याहस्ते १४ नोव्हेंबरला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. हा उपक्रम २0 नोव्हेंबरअखेर सुरु राहणार असून शहरातील सर्व प्रभागात ही मोहीम राबविली जाणार आहे. उद्घाटनावेळी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, नगरसेवक चंद्रकांत पाटील, बी. ए. पाटील, सौ. अरुणादेवी पाटील, छाया देसाई, सुभाष देसाई, शहाजी पाटील, विजय कोळेकर, रणजित मंत्री, संदेश शहा, सदानंद पाटील, रवी सूर्यवंशी, अभिजित कुर्लेकर, जालिंदर कोळी उपस्थित होते.
स्वच्छता अभियान हे काही तासांसाठी करुन चालणार नाही. शहरामध्ये प्रचंड कचरा साठलेला आहे. तो कचरा युध्दपातळीवर हटवला पाहिजे. नियमितपणे शहराची स्वच्छता केली पाहिजे. शहरातील गटारी तुंबलेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरुन वाहते. भुयारी गटार योजनेचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.
- बाबासाहेब सूर्यवंशी, माजी नगरसेवक