नीरा-देवघर ६६.८१ , तर भाटघर : ६४.७९ टक्के
By Admin | Updated: August 3, 2016 00:57 IST2016-08-03T00:57:52+5:302016-08-03T00:57:52+5:30
तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे.

नीरा-देवघर ६६.८१ , तर भाटघर : ६४.७९ टक्के
भोर : तालुक्यातून १५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस सोमवारपासून पुन्हा बरसू लागला आहे. सोमवारी नीरा-देवघर धरण भागात सुमारे १०२ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्यासाठ्यातही वाढ होऊन नीरा-देवघर धरण ६६.८१ टक्के, तर भाटघर धरण ६४.७९ टक्के भरले आहे. नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत.
तालुक्यातील दोन्ही धरणे १५ दिवसांत ५० टक्के भरली; मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांनीच वाढला होता. तर, लागवड झालेले भात खराब झाले होते. नवीन लागवड करण्यासाठी पाण्याची गरज होती; मात्र पाऊस होत नव्हता. १ आॅगस्टपासून भोर तालुक्यात दमदार पावसाला सुरवात झाली आहे. नीरा-देवघर धरण भागात आज १०२ मि.मी., तर एकूण १,२३० मि.मी. पाऊस होऊन धरण ६६.८१ टक्के भरले आहे. तर, भाटघर धरण भागात आज २२ मि.मी. तर एकूण ४७७ मि.मी. पाऊस झाला असून धरण ६४.७९ टक्के भरले आहे. गेल्या वर्र्षीच्या तुलनेत या वेळी अधिक पाऊस असून धरणातील पाणीसाठा जास्त आहे.
>तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. डोंगरदऱ्यांतील झरे, ओढे, नाले भरून पुन्हा वाहू लागले आहेत. नीरा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. भातपिकासह कडधान्य पिकांनाही या पावसाचा चांगला फायदा होईल.
- सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी