मुंबईत कांदा विक्री केंद्रांची गरज
By Admin | Updated: August 23, 2015 00:37 IST2015-08-23T00:37:40+5:302015-08-23T00:37:40+5:30
दोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली.

मुंबईत कांदा विक्री केंद्रांची गरज
- नामदेव मोरे, नवी मुंबई
दोन वर्षांपूर्वी कांदा व भाजीचे दर गगनाला भिडल्यानंतर आघाडी सरकारने मुंबईमध्ये १००पेक्षा जास्त स्वस्त भाजीविक्री केंद्रे सुरू केली होती. त्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत झाली. युती शासनाने त्याच धर्तीवर कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू केली तरच ग्राहकांना दिलासा मिळेल, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. कांदा व डाळींचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मुंबई, नवी मुंबईमध्ये कांदा ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. तूरडाळ १७० रुपये दर, मूगडाळ, मसुरडाळीच्या किमतीही १२० रुपयांवर गेल्या आहेत. चनाडाळ कोणत्याही क्षणी शंभरी गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तिचे दर १००पर्यंत गेलेही आहेत. पहिल्यांदाच सर्व डाळींच्या किमतीने शंभरी ओलांडली आहे. आतापर्यंत फळे व भाजीपाला परवडत नसणाऱ्या सामान्य नागरिकांना डाळी खरेदी करणेही परवडेनासे झाले आहे. पूर्वी रेशनिंगवर तूरडाळ उपलब्ध होत होती. परंतु तीही आता मिळत नाही. सामान्य नागरिकांसमोर घर चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विरोधात असताना महागाईविरोधात काँगे्रस आघाडी सरकारवर टीका करणारे शिवसेना व भाजपाचे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.
दोन वर्षांपूर्वी काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस सरकारने मुंबईत तब्बल ११० स्वस्त भाजीपाला केंद्रे सुरू केली होती. तत्कालीन पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय घेतला होता.
मुंबई एपीएमसीमधील भाजीपाला महासंघ, भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे, उपसचिव अविनाश पाटील यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली होती. या केंद्रांमुळे बाजारभाव कमी करण्यात आले होते. किरकोळ मार्केटमध्ये ७० रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा स्वस्त भाजीपाला केंद्रांमध्ये ४० ते ५० रुपयांना उपलब्ध करून दिला होता. याच धर्तीवर आता शासनाने मुंबईसह राज्यात स्वस्त भाजी व कांदा विक्री केंद्रे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
रेशनवर मिळाव्या डाळी
राज्यात शहर ते गावपातळीपर्यंत
सर्व ठिकाणी रेशनिंग दुकाने आहेत. महागाईपासून त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेशनिंगवर स्वस्त दरात तूरडाळ, मूगडाळ, मसुरडाळ व चनाडाळ उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी शासनाने स्वस्त भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली होती. त्याच धर्तीवर मुंबईत कांदा व डाळी विक्री केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. स्वस्त विक्री केंद्रे सुरू केल्यानंतरच महागाई नियंत्रणात येईल.
- अशोक वाळुंज,
माजी संचालक, एपीएमसी