शंभर अणुऊर्जा प्रकल्पांची गरज
By Admin | Updated: December 1, 2014 00:13 IST2014-11-30T21:57:04+5:302014-12-01T00:13:28+5:30
अनिल काकोडकर : विजेची गरज भागविण्यासाठी वीजनिर्मिती हवी

शंभर अणुऊर्जा प्रकल्पांची गरज
सातारा : देशाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याचप्रमाणे त्याच्या गरजाही वाढत आहेत. त्यामध्ये वीज ही महत्त्वाची गरज असून, त्यावर सर्व अवलंबून आहे. आगामी काळात देशात विजेची गरज भागविण्यासाठी दहा पट विजेची निर्मिती करावी लागणार आहे. विजेची गरज भागविण्यासाठी जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील,’ असे मत अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमासाठी ते साताऱ्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. काकोडकर म्हणाले, ‘सध्या भारताची लोकसंख्या एक अब्जच्या पुढे गेली असून, सध्या जी वीज निर्माण होत आहे. त्यापेक्षा सहा पट वीज आगामी काळात लागणार आहे. अणुऊर्जा हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. देशाला आगामी काळात अणुऊर्जाच तारणार असून, जैतापूरसारख्या शंभर प्रकल्प उभारावे लागतील. तरच विजेची गरज पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाच्या बाबतीत प्रवासाचे उदाहरण घेतले तर जागतिक सर्वेक्षणानुसार विमान प्रवास करणे सुरक्षित मानले जाते. काही ठिकाणी याचे दुष्परिणाम जाणवले असतील; परंतु सगळ्याच ठिकाणी असे दुष्परिणाम होईत असे नाही. ज्याप्रमाणे एखादी विमान दुर्घटना झाली की नागरिक विमान प्रवास करणे सोडत नाहीत, त्या सारखाच हा प्रकार
आहे. (प्रतिनिधी)
शासनाने प्रश्न निकाली काढावा
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत आपली सकारात्मक भूमिका आहे. सध्याचे स्त्रोत हे संपत आल्यामुळे अणुऊर्जा पुढील काळात महत्त्वाची ठरणार आहे. औष्णिक, जलविद्युत आणि कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेला मर्यादा पडतात. मात्र, अणुऊर्जेला कोणत्याही मर्यादा नसून, या उर्जेचा आपण कधीही आणि केव्हाही उपयोग करू शकतो. नव्या शासनाने या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.