कोल्हापुरातील फुटबॉलला दिशा देण्याची गरज

By Admin | Updated: June 29, 2015 00:08 IST2015-06-29T00:08:16+5:302015-06-29T00:08:16+5:30

नौशाद मुस्सा : पुणे एफसी अकॅडमीतर्फे १७ व १९ वर्षाखालील फुटबॉलपटूंची निवड चाचणी

The need to give direction to football in Kolhapur | कोल्हापुरातील फुटबॉलला दिशा देण्याची गरज

कोल्हापुरातील फुटबॉलला दिशा देण्याची गरज

कोल्हापूर : कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये भरपूर क्षमता आहे. मात्र, त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. फक्त खेळाडूंमध्ये सुधारणा करून चालणार नाही, तर येथील प्रशिक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षण दिले पाहिजे, असे मत पुणे एफसीच्या १९ वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षक नौशाद मुस्सा यांनी व्यक्त केले.
रुईकर कॉलनी येथील मैदानावर भारतातील अग्रगण्य क्लब असणाऱ्या पुणे एफसी अकॅडमी फुटबॉल संघाकडून कोल्हापुरातील १७ व १९ वर्षांखालील फुटबॉल खेळाडूंच्या निवड चाचणीसाठी ते कोल्हापुरात आले असता ‘लोकमत’शी बोलत होते.
मुस्सा म्हणाले, कोल्हापुरात मोठ्या प्रमाणारव मुले फुटबॉलकडे वळत आहेत, ही चांगली बाब आहे. त्यांच्यात गुणवत्तेची कमी नाही. मात्र, मोठ्या स्पर्धेत येथील फुटबॉलपटंूना खेळण्यासाठी अजून बराच कालावधी जावा लागेल. यासाठी येथील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, चांगली मैदाने, पायाभूत सुविधा पुरवणे गरजेचे आहे. येथील खेळाडूंनी आपल्या आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोल्हापुरात फुटबॉल खेळाबद्दल असलेली ओढ पाहून मला आनंद वाटतो. त्यांना योग्यरीत्या घडवण्यात त्यांच्या प्रशिक्षकांचा मोठा वाटा आहे. अन्य ठिकाणच्या फुटबॉल प्रशिक्षणाशी तुलना करता येथे काही विशेष फरक असा वाटत नाही. मात्र, येथील प्रशिक्षकांनी अत्याधुनिक प्रशिक्षण घेतल्यास ते जास्त फायद्याचे ठरेल. तसेच प्रशिक्षक असो किंवा खेळाडू त्यांनी आपले गाव सोडण्याची मानसिकता तयार केली पाहिजे.
या निवडीसाठी पुणे एफसीचे कोल्हापूरचे समन्वयक म्हणून विकास पाटील, पुणे एफसीचे कोल्हापूरचे प्रशिक्षक अमित पोवार मदत करत आहेत. नगरसेवक प्रकाश पाटील, विनायक फाळके यांनी सहकार्य केले.

आज शेवट...
सकाळी १९ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी घेण्यात आली. आज, सोमवारी सकाळी १७ वर्षांखालील मुलांची निवड चाचणी घेतली जाणार आहे. या दोन्ही वयोगटांतील फुटबॉलपटूंमधील कौशल्य शोधून त्यांना नवीन तंत्रशुद्ध फुटबॉल खेळाचे धडे दिले जाणार आहेत.

Web Title: The need to give direction to football in Kolhapur