सुरक्षित मातृत्वाबाबत जनजागृती हवी

By Admin | Updated: July 10, 2016 04:33 IST2016-07-10T04:33:58+5:302016-07-10T04:33:58+5:30

अनेकदा दाम्पत्य बाळाविषयी बोलणे टाळतात. शहरी भागात ‘फॅमिली प्लॅनिंग’ हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत असला तरीही फक्त बाळ कधी हवे? याचा विचार केला जातो.

Need awareness about safe motherhood | सुरक्षित मातृत्वाबाबत जनजागृती हवी

सुरक्षित मातृत्वाबाबत जनजागृती हवी

- पूजा दामले, मुंबई

अनेकदा दाम्पत्य बाळाविषयी बोलणे टाळतात. शहरी भागात ‘फॅमिली प्लॅनिंग’ हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत असला तरीही फक्त बाळ कधी हवे? याचा विचार केला जातो. दाम्पत्य आर्थिक परिस्थिती अथवा त्यांच्यातील नात्याचा विचार करून बाळ कधी व्हावे हे ठरवतात. पण, यापेक्षाही सुरक्षित मातृत्वासाठी दाम्पत्यांमध्ये चर्चा होणे आवश्यक आहे. त्यांच्या आरोग्याविषयी त्यांना माहिती हवे याविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘मातृ सुरक्षा दिना’निमित्त या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मातामृत्यूचा दर कमी करण्यासाठी सरकारने विशेष योजना राबविल्या आहेत. त्यात काही प्रमाणात यश आले आहे. पण, तरीही मातामृत्यू कमी करण्यासाठी विशेष करून महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भधारणेआधी महिलांनी स्वत:च्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. शहरी भागातील मुली अभ्यास, करिअरमुळे उशिरा लग्न करतात. त्यामुळे बाळ होण्याचे वय २८च्या पुढे गेले आहे. अनेक महिलांना तिशीनंतर गर्भधारणा होते. अशावेळी महिलांनी प्लॅनिंग करणे आवश्यक असल्याचे मत कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री कटके यांनी व्यक्त केले.
डॉ. कटके यांनी पुढे सांगितले, तिशीनंतर महिलांना गर्भधारणा झाल्यास त्यांनी ‘ट्रीपल स्क्रिनिंग टेस्ट’ केली पाहिजे. त्याचबरोबर चांगला आहारही घेतला पाहिजे. गर्भधारणा झाल्यावर महिलांनी स्वत:ची काळजी घेतल्यास प्रसूतीवेळी होणारी गुंतागुंत टाळता येणे सहज शक्य आहे. गर्भवती महिलांनी त्यांचा दिनक्रम ठरवून घेतला पाहिजे. दुपारी दोन तास त्यांनी आराम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रात्री सात तास शांत झोप घेतली पाहिजे. प्रसूतीवेळी गुंतागुंत झाल्यास रक्त अथवा रक्तातील घटकांची आवश्यकता असते. शहरी भागात रक्तघटक सहज उपलब्ध होतात. तथापि, ग्रामीण भागात महिलेला रक्त गोठण्याचा त्रास झाल्यास रक्तघटक सहज उपलब्ध होत नाहीत. या परिस्थितीत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.
कूपर रुग्णालयाच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले, देशात अजूनही मातामृत्यूचे प्रमाण प्रगत देशापेक्षा अधिक आहे. देशात १ लाख प्रसूतींमध्ये सुमारे १७५ मातांचा मृत्यू होतो. हे प्रमाण कमी करण्यासाठी काही विशेष बाबींकडे ‘मातृ सुरक्षा दिना’निमित्त लक्ष वेधणे आवश्यक आहे. दाम्पत्याने बाळासाठी प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. बाळाचे प्लॅनिंग झाल्यावर त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटले पाहिजे. स्त्रीरोग तज्ज्ञांनी समुपदेशन केल्यामुळे गर्भधारणेत आणि गर्भारपणात येणाऱ्या अनेक अडचणी सहज टाळता येऊ शकतात. हे सुरक्षित मातृत्वाकडे टाकलेले पहिले पाऊल असते.
गर्भधारणा होण्याआधी ३ ते ६ महिने महिलेने स्वत:च्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. महिलेने लोह, कॅल्शियमच्या गोळ्या डॉक्टरच्या सल्ल्याने घेतल्या पाहिजेत. डॉक्टरांकडे येऊन नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अन्य बाबींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याकडच्या रस्त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे. गर्भवती महिलेला स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. चांगले वातावरण असणे आवश्यक आहे. महिला कुपोषित असल्यास मृत्यूचा धोका वाढतो. अ‍ॅनिमियाचे प्रमाण कमी व्हायला मुलींचे आरोग्य लहानपणापासून चांगले असावे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

गर्भवती महिलांनी कोणता आहार घ्यावा
सुदृढ बालकासाठी आणि महिलांनी स्वत:च्या आरोग्यासाठी गर्भधारणा झाल्यापासून सकस आणि ताजा आहार घेतला पाहिजे. अनेक महिलांना हॉटेलिंग करण्याची सवय असते. त्यामुळे गर्भधारणा झाल्यावरही या महिला बाहेरचे अन्न पदार्थ खाण्यास पसंती देतात. हे चुकीचे आहे. महिलांनी गर्भारपणात आणि मूल जन्माला आल्यावरही पुढचे काही महिने घरचे अन्न खाणे आवश्यक आहे. महिलांनी दिवसातून थोड्या थोड्या वेळाने खाणे आवश्यक आहे. महिलांच्या आहारात या अन्नपदार्थांचा समावेश असणे आवश्यक आहे
च्फळभाज्या, पालेभाज्या, दूध, अंडी, नाचणी, बाजरीची भाकरी, तूप, फळ, फळांचा ताजा रस, पाणी उकळून-गाळून प्यावे

या तपासण्या
करणे आवश्यक
एचआयव्ही एड्स, मधुमेह, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबिन, मूत्र तपासणी

गर्भारपणात कोणती लक्षणे धोकादायक
-पायांना खूप सूज येणे, रक्तदाब वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे

गर्भधारणेआधी
महिलांना काय
माहीत हवे?
- गर्भधारणा होण्याआधी महिलांना स्वत:विषयीही प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे.
- रक्तगट, हिमोग्लोबिनची पातळी, रक्तातील साखरेचे प्रमाण, अनुवंशिक आजारांविषयी माहिती

काय टाळावे :
जास्त कॅलरिज असणारे अन्नपदार्थ, मद्यपान, धूम्रपान, फळांचा पॅकबंद ज्यूस, अति जड वस्तू उचलणे

कधी करावी सोनोग्राफी?
महिलेला गर्भधारणा झाल्यावर पहिल्यांदा रुग्णालयात नावनोंदणीसाठी येते तेव्हा एकदा सोनोग्राफी करणे आवश्यक आहे. त्यानंतर १८ ते २० आठवड्यांत सोनोग्राफी होणे आवश्यक आहे. या कालावधीत बाळाची वाढ किती झाली आहे, हे कळते. त्यात कोणते व्यंग आहे की नाही? हे या सोनोग्राफीतून कळू शकते.
या कालावधीत सोनोग्राफी केल्यास बाळात व्यंग असल्यास कायदेशीर पद्धतीने गर्भपात करता येणे शक्य असते. व्यंग असलेले बाळ नऊ महिने पोटात वाढविणे हे आईसाठी खूप कठीण असते. त्यामुळे २० आठवड्यांआधी व्यंग लक्षात आल्यास गर्भपात करणे शक्य आहे. त्यानंतर नवव्या महिन्यात सोनोग्राफी केली पाहिजे. त्यामुळे बाळाची पोझिशन कळते.

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
केंद्र सरकारने गर्भवती महिला आणि बालकांसाठी हा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये मोफत प्रसूती होते. सिझेरियनही मोफत होते. औषधांचा खर्च सरकारतर्फे केला जातो. मुलाच्या जन्मानंतर एक महिना त्यालाही मोफत औषध, उपचार, रक्ताची आवश्यकता असल्यास रक्त यांचा पुरवठा केला जातो.

जननी सुरक्षा योजना
सुदृढ माता आणि बालकांचे प्रमाण वाढावे. मातामृत्यू कमी व्हावेत यासाठी ‘जननी सुरक्षा योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत १९ वर्षांवरील मातेला दोन मुलांच्या जन्मावेळी ५५० रुपये देण्यात येतात. अन्य मदतही मातेला केली जाते.

१०८ ला कॉल करा
गर्भवती महिलेला प्रसूतीवेदना सुरू झाल्यावर रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी आणि प्रसूतीनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यासाठी मोफत विशेष रुग्णवाहिकांची सेवा राज्य सरकारने सुरू केली आहे. या रुग्णवाहिकेला संपर्क साधण्यासाठी १०८ हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. अनेकदा वेळेत महिला रुग्णालयात पोहोचली नाही, तर काही गुंतागुंत निर्माण होते. शहरातही अनेकदा वाहन पटकन न मिळाल्याने गर्भवती महिलेला त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा पुरवली जाते.

गर्भवती महिलेची रुग्णालयात नावनोंदणी आवश्यक
- महिलेला गर्भधारणा झाल्याचे कळल्यावर तत्काळ रुग्णालयात त्या महिलेची नावनोंदणी करणे आवश्यक आहे. महिलेच्या नावाची नोंदणी केल्यावर कमीतकमी ३ वेळा डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.
- पहिल्या तीन महिन्यांत प्रत्येक महिन्यात डॉक्टरकडे गेले पाहिजे, तिसऱ्या ते सहाव्या महिन्यात दर तीन आठवड्यांनी डॉक्टरकडे गेले पाहिजे
-सहाव्या ते नवव्या महिन्यात प्रत्येक १५ दिवसांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे, दोन धनुर्वाताची इंजेक्शन्स घेतली पाहिजेत.

Web Title: Need awareness about safe motherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.