आवश्यक तिथे अॅट्रॉसिटीमध्ये दुरुस्ती करावी लागेल- शरद पवार
By Admin | Updated: August 28, 2016 19:21 IST2016-08-28T19:21:36+5:302016-08-28T19:21:36+5:30
कोपर्डी घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही.

आवश्यक तिथे अॅट्रॉसिटीमध्ये दुरुस्ती करावी लागेल- शरद पवार
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 28 - कोपर्डी घटनेनंतर उमटलेली प्रतिक्रिया दुर्लक्षित करण्यासारखी नाही. जिथे आवश्यक आहे, त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कोपर्डी घटनेनंतर राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत आहेत आणि या मोर्चांमध्ये अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी होत आहे, यासंदर्भात विचारले असता खा. पवार यांनी वरील उत्तर दिले. गेल्या काही दिवसांत अत्याचाराच्या तीन चार घटना घडल्या. त्या दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. या अन्याय अत्याचाराविरुध्द प्रतिक्रिया उमटणे साहजिक आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या परिणामाचाही विचार करावा लागेल. त्यामुळे या कायद्यात जिथे दुरुस्ती शक्य असेल तिथे ती करावी लागेल, असे ते म्हणाले.
एटीएसकडून अधिकाराचा गैरवापर
अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांचे एटीएस (अँटी टेररिझम स्वॉड)ने ह्यइसिसह्णच्या नावाखाली अटकसत्र चालविले असून एटीएस कडून अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप खा. शरद पवार यांनी यावेळी केला. मराठवाडा आणि राज्यातील अनेक भागात अल्पसंख्याक समाजाच्या तरुणांना इसिसशी संपर्क ठेवल्याचा आरोप करत एटीएसने अटकसत्र चालविले आहे, अशी राज्यातील अनेक मुस्लिम संघटनांनी मला भेटून सांगितले. मराठवाड्यात ह्यएटीएसह्ण कडून अधिकाराचा गैरवापर होत आहे, हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. देशविरोधी कृत्यामध्ये जर कोणी असेल तर त्यांना २४ तासाच्या आत न्यायालयासमोर सादर करुन त्याच्यावर आरोपपत्र दाखल करुन केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविले पाहिजेत, असे अनेक बिगरराजकीय मुस्लिम संघटनांची मागणी आहे. मात्र ह्यएटीएसह्ण अटक करुन अल्पसंख्याक तरुणांना अनेक दिवस न्यायालयासमोर सादर करत नाही. त्यामुळे ह्यएटीएसह्ण सारख्या शोध घेणाऱ्या यंत्रणांची चौकशी करावी लागेल. यापूर्वी मालेगाव प्रकरणात आरोपी असलेले मुस्लिम समाजाचे तरुण नंतर आरोपातून मुक्त झाले. हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून राज्य सरकारने या प्रकरणात निष्पक्षपातीपणे काम करणारे अधिकारी नेमावेत असे खा. पवार म्हणाले.