शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

सार्वजनिक अवकाशातला आवश्यक हस्तक्षेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:57 PM

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका, प्राध्यापक पुष्पा भावे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्याविषयी जागवलेल्या या आठवणी...

सार्वजनिक अवकाशात विचारशील संस्कृतीकर्मींचा हस्तक्षेप आवश्यक असतो. आपापल्या क्षेत्रात केलेल्या अध्ययन-व्यासंगातून, अनुभवांतून त्यांचे विश्वभान व्यापक झालेले असते. असे विचारवंत सार्वजनिक अवकाशात जेव्हा लोकांच्या बाजूने हस्तक्षेप करतात, तेव्हा त्याला नैतिक पाठबळ असते. लोकांकडूनही अधिमान्यता मिळतेच, पण लोकांचे प्रश्न थेट ऐरणीवर आणून त्याची व्यवस्थेकडून तड लावण्यासाठीचा दाब ते आणू शकतात. पुष्पाताई भावे या अशा प्रकारच्या लेखिका, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या. साहित्य-कला क्षेत्रातून याआधी दुगाबाई भागवत, विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले आणि अलीकडे डॉ. गणेश देवी ही उदाहरणे आहेत.गेल्या दोन वर्षांतील त्यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांचे निघून जाणे अपेक्षित असले तरी धक्कादायक आहेच. कारण आपल्या कणखर स्वभावाने आजाराला नमवत त्या लेखनाचे, भाषांतराचे काम अखेरपर्यंत करत होत्या. त्यांच्याशी आठवड्याने होणाऱ्या फोनवरूनही त्यांच्या नव्या वाचनाबद्दल, लेखनाच्या संकल्पांबद्दल कळत होते. पुष्पातार्इंच्या निधनाने प्रखर, निर्भीड हस्तक्षेप करणारे पुरोगामी व्यक्तिमत्त्व हरवले आहे.मागच्या वर्षीच्या प्रारंभीच अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित करण्यात आलेल्या प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करून त्यांचा अपमान करण्याचा उद्दामपणा आयोजकांनी आणि त्यांच्या हितसंबंधीयांनी केला होता. महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेच्या वतीने त्यांची माफी मागावी आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर होणाºया दडपणुकीविरुद्ध आवाज उठवावा म्हणून २९ जानेवारीला मुंबईत ‘चला, एकत्र येऊया’ हा कार्यक्रम झाला होता. नयनतारा सहगल त्यासाठी खास डेहराडूनहून आल्या होत्या. त्या कार्यक्रमाचा प्रारंभ पुष्पातार्इंच्या भाषणाने व्हावा ही आयोजकांची इच्छा होती. त्यावेळी पुष्पातार्इंची प्रकृती बरी नव्हती. तरीही त्या कार्यक्रमाला व्हीलचेअरवर आल्या आणि कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित राहिल्या. भालचंद्र नेमाडेसुद्धा या कार्यक्रमाला व्हीलचेअरवर प्रेक्षकांत उपस्थित होते. त्या दिवसानंतर पुष्पातार्इंचा रक्तदाब वाढला. त्यांना मधुमेह होताच. या कारणांनी त्या रुग्णालयात दाखल झाल्या आणि अखेरपर्यंत नर्सिंग होममध्येच त्यांचे वास्तव्य होते. अखेरपर्यंत आपल्याकडून शक्य होईल तिथे काम करत राहायचे ही त्यांनी बांधिलकी अखेरपर्यंत जपली.मूलत: त्या शिक्षिका असल्या तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बहुविध पैलू होते. लोकशाहीवादी मूल्यांच्या ठाम समर्थनासाठी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्रामापासून कामगार चळवळी, स्त्रीवादी चळवळी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, असंघटित कामगार आणि कष्टकऱ्यांच्या चळवळी अशा अनेक चळवळीत सक्रिय सहभाग दिलेला होता. आणीबाणीच्या विरोधात आणि त्यानंतरच्या निवडणूक प्रचारात त्या प्रत्यक्ष कार्यरत असल्याने त्यांना लहान मोठे तुरुंगवास आणि पोलीस पहाºयांच्या अनुभवांतूनही जावे लागले. रमेश किणींच्या गूढ मृत्यूनंतर त्यांनी दिलेला न्यायालयीन लढा यात दाखवलेले धैर्य सामान्य माणसासाठी, न्यायाची बूज राखणाºयांसाठी लखलखीत उदाहरण होते.नाट्यचळवळीच्या प्रारंभी नवी प्रायोगिक नाटके करणाºया रंगधर्मींना त्यांनी नाट्यविषयक सुस्पष्ट असा दृष्टिकोन पुरवणारी दिशा दिली. त्यासाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्या. जागतिक रंगभूमीच्या इतिहासाच्या परिप्रेक्ष्यात मराठी नाटक ठेवून त्याचे विश्लेषण करण्याची जाण विकसित केली.मुळात त्यांचा पिंड गंभीर अध्यापकाचा होता. अध्यापनाचा त्यांनी खोलवर तात्त्विकदृष्ट्या विचार केलेला होता. शिकायला येणाºया विद्यार्थ्यांची पातळीच कमी आहे म्हणून त्यांना पातळ करून शिकवणे त्यांना मंजूर नसले तरी ज्या पदवीसाठी विद्यार्थी महाविद्यालयात दाखल होतो, त्या विषयाची व्याप्ती कळण्यासाठी त्यांना आरंभीच ‘दिशा दाखवणे’ गरजेचे आहे असे त्या मानीत. हळूहळू पण गांभीर्याने विद्यार्थ्यांना विषयात समग्रतेने अभ्यास करून उतरावेच लागेल, त्यासाठी शिक्षकाने साहाय्यभूत व्हावे असे त्यांना वाटे. जुने साहित्य शिकवताना ते केवळ बाजूला न सारता त्यातले मूल्यभान आणि कालिक संदर्भ यांचा ताळमेळ घालता आला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. साहित्य शिकवणे म्हणजे क्रमाने संहिता गद्यरूपात शिकवणे नव्हे, तर त्या संहितेविषयी भान व्यापक करता येणे, नटसम्राट शिकवताना किंग लिअर आणि त्याची पार्श्वभूमीही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे.त्या भाषांतरविद्या हा विषय शिकवत होत्या, तेव्हा त्यावर मराठीत पुरेशी पुस्तके उपलब्ध नव्हती. तेव्हा त्यांनी पाश्चात्त्य साहित्यातील या विद्याशाखेच्या संदर्भग्रंथांचा अभ्यास करून आपली टिपणे बनवली आणि हा विषय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय केला.एक्याऐंशी वर्षांच्या या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाला इतके कंगोरे आणि पैलू आहेत की, मर्यादित अवकाशात त्यांना न्याय देणे अशक्य आहे. पहिल्यांदा त्यांना ऐकले ते साताºयाला गौरी देशपांडे यांच्या साहित्यावर चर्चासत्र झाले होते तेव्हा. त्यानंतर पुण्यात अखिल भारतीय स्त्रीअभ्यास परिषद झाली तेव्हा त्या नुकत्याच निवृत्त झाल्या होत्या. त्यावेळी त्यांचे स्पष्ट धारदार वक्तृत्व लक्षात राहिले होते. त्यांच्या वक्तृत्वात विस्तृत वाचन, व्यासंग, आंतरविद्याशाखीय संदर्भ आणि व्यवहारातली चपखल उदाहरणे असत. दिलेल्या वेळेचे भान नेमके असे. पुढे त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी म्हणून मला काम करता आले. अनुवाद सुविधा केंद्राच्या त्या अध्यक्ष होत्या आणि ‘मायमावशी’ या भाषांतरविषयक नियतकालिकाच्या सल्लागार संपादक. या केंद्राचा मी कार्याध्यक्ष आणि अंकाचा संपादक या नात्यानेही गेल्या काही वर्षांत आमचा नियमित संपर्क होता. अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते विषय नव्याने उलगडले जात. ‘दिशा देणे’ हे त्या त्यांचा विषय शिकवण्याबाबत वापरत, पण त्यांचे हे दिशा दाखवणे अनेक पातळ्यांवर अनेक बाबतीत होते आणि त्याची कधी नव्हे इतकी आज गरज होती.

-गणेश विसपुते(गणेश विसपुते हे कवी, भाषांतरकार आहेत.आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे कार्याध्यक्ष आणि मायमावशी या नियतकालिकाचे संपादक आहेत.)