नाशिकचा गड राखण्यासाठी मनसेला राष्ट्रवादीचा टेकू ?
By Admin | Updated: September 10, 2014 12:45 IST2014-09-10T11:29:22+5:302014-09-10T12:45:25+5:30
भाजपने काडीमोड घेतल्याने नाशिकमधील मनसेची सत्ता जाण्याची चिन्हे असतानाच नाशिकचा गड राखण्यासाठी मनसे नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बिनशर्त पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

नाशिकचा गड राखण्यासाठी मनसेला राष्ट्रवादीचा टेकू ?
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १० - भाजपने काडीमोड घेतल्याने नाशिकमधील मनसेची सत्ता जाण्याची चिन्हे असतानाच नाशिकचा गड राखण्यासाठी मनसे नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बिनशर्त पाठिंबा मागितला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे वरिष्ठ नेतेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असल्याने नाशिकमधील सत्तेचे 'गणित' आणखी कठीण बनले आहे.
नाशिकमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून मनसे आणि भाजपची युती होती. मात्र आता महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने मनसेला जय महाराष्ट्र करुन शिवसेनेची युती केली. १४४ जागा असलेल्या नाशिक महापालिकेत सत्तास्थापनेसाठी ६२ चे मॅजिक फिगर गाठणे आवश्यक आहे. सध्या मनसेकडे ३७ नगरसेवक असून राष्ट्रवादीचे २० नगरसेवक आहेत. म्हणजेच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास या दोघांचे संख्याबळ ५७ पर्यंत पोहोचेल. उर्वरित पाच मतांसाठी दोन्ही पक्ष काँग्रेस व अपक्ष नगरसेवकांची साथ घेऊ शकतात. यासंदर्भात मनसेच्या नाशिकमधील नेत्यांनी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. मनसेने महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बिनशर्त पाठिंबा मागितला आहे. तर राष्ट्रवादीकडून उपमहापौर किंवा अन्य एखादे महत्त्वाचे पद द्यावे अशी भूमिका मांडली आहे.
शिवसेना - भाजप युतीकडे ४७ नगरसेवक असून मॅजिक फिगर गाठण्यासाठी त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष यांची मदत लागणार आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्येही चर्चा सुरु असल्याचे समजते.
मनसेचे नगरसेवक शिवसेनेत
महापौरपदासाठी नाशिकमध्ये मनसेचे ३९ नगरसेवक निवडून आले होते. मात्र त्यापैकी दोघांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेचे संख्याबळ ३७ वर आले आहे,