ठाण्यात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा
By Admin | Updated: February 23, 2015 02:56 IST2015-02-23T02:56:17+5:302015-02-23T02:56:17+5:30
‘छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी होते का?’ या विषयावर मुस्लिम यूथ फेडरेशनतर्फे ठाण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता

ठाण्यात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा
ठाणे : ‘छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी होते का?’ या विषयावर मुस्लिम यूथ फेडरेशनतर्फे ठाण्यात परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. बजरंग दलासह हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या परिसंवादाला परवानगी नाकारली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात शनिवारी मोर्चा काढला होता. जमावबंदीचा आदेश मोडून मोर्चा काढणाऱ्या माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाडांसह १५० कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही हिंदू-मुस्लिम भेदभाव केला नाही. तरीही, ते मुस्लिमविरोधी असल्याचा अपप्रचार केला जातो. यावर चर्चा होण्यासाठी ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी या परिसंवादाचे आयोजन केले होते. त्याला बजरंग दलाचे सुनेश जोशी, विक्रम भोईर यांच्यासह काही संघटनांनी विरोध दर्शविला होता. जे वक्ते या परिसंवादात आहेत, त्यामध्ये आणखी दोन हिंदुत्ववादी संघटनांच्या वक्त्यांचा समावेश करावा. तो कार्यक्रम गडकरी रंगायतनमध्ये घेण्यात येऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केली होती. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर शुक्रवारी रात्री नौपाडा पोलिसांनी या परिसंवादाला परवानगी नाकारली.
या निषेधार्थ पाचपाखाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ते गडकरी रंगायतनदरम्यान सायंकाळी ६.३० ते ७.३० वा. दरम्यान निषेध मोर्चा काढला. पोलीस आयुक्तांचा
मनाई आदेश मोडणाऱ्या आव्हाडांसह नजीब मुल्ला, नगरसेवक मिलिंद पाटील, शानू पठाण, अमित सरैय्या, मनोहर साळवी, सुहास देसाई आणि मुकुंद केणी आदी १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)