भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत खदखद
By Admin | Updated: November 20, 2014 10:14 IST2014-11-20T02:42:33+5:302014-11-20T10:14:13+5:30
राज्यातील भाजपाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच वैचारिक गोंधळ असल्याचे चिंतन बैठकीत दिसून आले.

भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत खदखद
चोंढी (अलिबाग) : राज्यातील भाजपाच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्येच वैचारिक गोंधळ असल्याचे चिंतन बैठकीत दिसून आले. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतरही सत्तेची सुत्रे आपल्या हाती असल्याचा आनंद काहीनी व्यक्त केला, तर भाजपाला पाठिंबा देऊन पक्षाने धर्मनिरपेक्ष विचारधारेला सोडचिठ्ठी दिल्याची भावना काहीनी व्यक्त केली.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, माजी मंत्री जयंत पाटील, माजी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी आपली परखडे मते मांडली. त्यांच्या मते, भाजपा सरकारला पाठिंबा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेबाबत जनमानसांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे. त्याचा फटका पक्षाला बसतो. आपल्या पक्षाच्या भूमिकेत स्पष्टता असायला हवी आणि ती तितक्याच जोरकसपणे त्याचवेळी माध्यमांकडे मांडली गेली पाहिजे, असा आग्रहही या नेत्यांनी धरला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या पाठिंब्याबाबत दोन दिवसात केलेली उलटसुलट वक्तव्य आणि पक्षाच्या विचारधारेबाबत नेत्यांनीच व्यक्त केलेली शंका, असे राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या बैठकीत चित्र दिसले.
‘पक्षाची विचारधारा’ या विषयावर विधानसभेचे माजी सभापती दिली वळसे पाटील यांचे भाषण झाले. आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे. पण राज्यात स्थैर्य राहावे यासाठी आपण भाजपाला पाठिंब्याची भूमिका घेतली, असे समर्थन त्यांनी केले. जातीयवादी पक्षांविरुद्ध आक्रमक नेते जितेंद्र आव्हाड हे भाजपाला पाठिंबा देण्यावरून अस्वस्थ असल्याची चर्चा बैठकस्थळी होती. पक्षाच्या भूमिकेवरून दलित, मुस्लिम मतदारांच्या मनात संशय निर्माण केला जात आहे. त्यामुळे आपली विचारधारा धर्मनिरपेक्षच आहे आणि राहील हे आपण ठासनू सगळ्यांना सांगितले पाहिजे, अशी आग्रही भूमिका आव्हाड यांनी सांडल्याचे समजते. माजी मंत्री जयंत पाटील यांनी कालच्या भाषणात भाजपाला पाठिंबा देण्यावरून नाराजी व्यक्त केली होती, अशी चर्चा आहे. मात्र आपण तसे बोललो नसल्याचा खुलसाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींजवळ केला. (विशेष प्रतिनिधी)