राष्ट्रवादीचे अंदाज चुकले
By Admin | Updated: May 17, 2014 04:43 IST2014-05-17T04:43:19+5:302014-05-17T04:43:19+5:30
नरेंद्र मोदी म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग,’ मोदींची हवा मीडियाने तयार केली असून ती प्रत्यक्ष प्रचारात मला कुठेही दिसत नाही,

राष्ट्रवादीचे अंदाज चुकले
नरेंद्र मोदी म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग,’ मोदींची हवा मीडियाने तयार केली असून ती प्रत्यक्ष प्रचारात मला कुठेही दिसत नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ठासून सांगत होते, पण हेलिकॉप्टरमधून जाताना खालच्या गावांविषयी खडान्खडा माहिती देणार्या पवारांना मोदी हवेचा अंदाज न आल्याने राष्ट्रवादीची दुर्गती झाली. मोदींची हवा नव्हती तर मोठे साहेब स्वत: का लढले नाहीत; ते आधीच राज्यसभेत का गेले? हवेचा अंदाज एकतर त्यांना नव्हता किंवा होता तर त्यांनी तो स्वत:पुरताच ठेवला का, असे प्रश्न आता विचारले जातील. आजच्या निकालाने शरद पवार यांचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान आता जवळपास संपुष्टात आले आहे. पक्षाचे वजनदार नेते रिंगणात उतरविले की काम सोपे होईल, हा होराही पार चुकला. कारण पवार ज्यांना वजनदार समजत होते त्यांनाच आडवे करण्याचे मतदारांनी ठरविले आहे, याचा अंदाजही त्यांना आला नाही. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, डॉ. पद्मसिंह पाटील, सुनील तटकरे, मनीष जैन, नवनीत कौर-राणा आदी पालापाचोळ्यासारखे उडाले. दिल्लीत जाण्याची अजिबात इच्छा नसलेल्यांच्या माथी जबरदस्तीने उमेदवारी मारण्यात आली. आता लोकसभेत आपटी खाल्ल्याने विधानसभेतील त्यांच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.