विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा दावा
By Admin | Updated: February 23, 2015 02:51 IST2015-02-23T02:51:47+5:302015-02-23T02:51:47+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असताना आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला आहे
विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीचा दावा
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असताना आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसने हक्क सांगितला आहे. ८-८ महिने हे पद वाटून घ्यायचे, असा निर्णय झाल्याचा
दावा त्यांनी केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निरीक्षकांकडे अहवाल मागवला आहे.
केडीएमसीत सद्यस्थितीला काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे समसमान म्हणजेच प्रत्येकी १५ सदस्य आहेत. यात एका अपक्षाचा पाठिंबा असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे. विरोधी पक्षनेतेपद मनसेकडून हिसकावून घेतल्यानंतर हे पद आलटूनपालटून भूषवायचे, असा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसचा आठ महिन्यांचा कालावधी संपल्याने आता हे पद आम्हाला मिळावे, अशी मागणी त्यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वासह प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी पक्षाचे कल्याण जिल्हा निरीक्षक संजय चौपाने यांना यासंदर्भात अहवाल देण्यास सांगितले आहे. दरम्यान, पद वाटून घेण्याचा निर्णय ज्या वेळी घेण्यात आला, त्या वेळी मी निरीक्षक नव्हतो. त्यामुळे चौकशीतून जी माहिती मिळेल, त्यानुसार अहवाल दिला जाईल, असे निरीक्षक चौपाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)