राष्ट्रवादीचे १३१, भाजपचे १७२ उमेदवार जाहीर

By Admin | Updated: September 27, 2014 05:44 IST2014-09-27T05:29:02+5:302014-09-27T05:44:38+5:30

महायुतीत फूट आणि आघाडीत बिघाडी झाल्याने मुंबईतील सर्व ३६ मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढतीचे चित्र पाहावयास मिळणार आहे

NCP's 131, BJP 172 candidates declared | राष्ट्रवादीचे १३१, भाजपचे १७२ उमेदवार जाहीर

राष्ट्रवादीचे १३१, भाजपचे १७२ उमेदवार जाहीर

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबतची २५ वर्षांची युती तुटल्याचे जाहीर केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी भाजपाने १७२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी रात्री विधानसभेच्या १३१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक उमेदवारांनी शुक्रवार सकाळपासून उमेदवारी अर्ज भरले

वांद्रे पूर्व
दुहेरी लढतीची दाट शक्यता
वांद्रे पूर्व हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी आता येथेही पंचरंगी निवडणूक होणार असल्याने सर्वपक्षीय उमेदवारांची ताकद पणाला लागणार आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार बाळा सावंत यांना गतवेळच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ४५ हजार ६५९ मते मिळाली होती आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार जर्नादर चांदूरकर यांना ३८ हजार २३९ मते मिळाली होती. या वेळच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अद्याप येथील उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. तरीही राष्ट्रावादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून संतोष धुवाळी यांचे नाव चर्चेत आहे, तर काँग्रेसला मात्र अद्याप येथून संभाव्य चेहराही मिळालेला नाही. शिवसेनेने पुन्हा बाळा सावंत यांना उमेदवारी दिली असून, मनसेने शिल्पा सरपोतदार यांना येथून उमेदवारी दिली आहे. तर भाजपाकडून महेश पारकर यांचे नाव निश्चित झाले आहे. वांद्रे विधानसभेवर सेनेची पक्कड असून, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. परिणामी पंचरंगी निवडणुकीमुळे येथे भाजपा आणि शिवसेना अशी जोरदार दुहेरी लढत होण्याची दाट शक्यता आहे.

वांद्रे (प.)
काँग्रेस विरुद्ध भाजपा थेट लढत

महायुती आणि आघाडी फुटली असली तरी वांद्रे पश्चिममध्ये मात्र काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच थेट लढत रंगणार आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबा सिद्दिकी विरुद्ध भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यात चुरशीच्या लढतीची शक्यता आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या तिन्ही पक्षांची स्थानिक पातळीवर विशेष ताकद नाही. येथील सारे राजकारण बाबा विरुद्ध आशिष यांच्या भोवतीच केंद्रित राहिले. अल्पसंख्याकांच्या मतांमध्ये समाजवादी पक्ष वाटेकरी आहे. मात्र, काँग्रेससोबत सपाची आघाडी झाल्याने बाबा सिद्दिकींना मतविभाजनाचा धोका नसेल. तर विविध सामाजिक संस्था आणि व्यक्तिगत जनसंपर्कावर शेलारांचा भरोसा आहे. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी मतदारसंघात कामे केली. गेल्या वेळी अवघ्या सोळाशे मतांनी शेलारांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लढतही चुरशीची होणार हे निश्चित. मनसेने येथून तुषार आफळे यांना तिकीट दिले. मात्र या मतदारसंघात मनसेचा फारसा प्रभाव नाही. तसेच आशिष शेलार आणि राज ठाकरे यांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यामुळे मनसे त्यांच्याशी कितपत लढत देऊ शकेल, हा प्रश्नच आहे.

भायखळा
चौरंगी लढत

भायखळा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे मधू चव्हाण, शिवसेनेचे यशवंत जाधव, मनसेचे संजय नाईक, अखिल भारतीय सेनेतर्फे गीता गवळी रिंगणात आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मधू चव्हाण यांचा ३६ हजार ३०२ मते मिळवून विजय झाला होता; तर संजय नाईक यांना २७ हजार १९८ मते पडली होती. या दोघांच्या मतांमध्ये जवळपास ९ हजार मतांचा फरक होता. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसने ५० हजार मतांची आघाडी घेतली होती. मनसेला २५ हजार मते तर शिवसेनेला सुमारे १४ हजार ७०० मते मिळाली होती. शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षांची मदार मराठी मतांवर आहे. मनसेचे संजय नाईक यांनी या मराठी मतदारांबरोबरच नव्याने जोडलेल्या मदनपुरा भागातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाकडून माजी आमदार मधू चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. शिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक बबन कनावजे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. सेनेचे यशवंत जाधव सलग दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या कामाचा फायदा त्यांना होईल. या ठिकाणी चौरंगी लढत होईल.

धारावी
चार पक्षांच्या प्रतिष्ठेची लढाई

गेली अनेक वर्षे धारावी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. गेली अनेक वर्षे युती आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जावे लागणाऱ्या नेत्यांना यंदा स्वत:ची ताकद पणाला लावावी लागणार आहे.विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली असून, त्यांनी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला अर्ज भरला. शिवसेनेकडून माजी आमदार बाबुराव माने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. परंतु या दोन्ही प्रमुख पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांविरुद्ध नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. भाजपाकडून कीर्ती ढोले या निवडणूक मैदानात उतरले आहेत. धारावीत भाजपाचे काही भागांमध्ये वर्चस्व आहे. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसू शकतो. तर राष्ट्रवादीकडून गोविंदभाई परमार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असल्याने काँग्रेसची मते विभागली जाणार आहेत. तसेच मनोहर रायबागे हे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याचे समजते. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक हनुमंत नंदपल्ली हेही अपक्षपणे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. सेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी या राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

माहीम
तिरंगी लढत होणार

एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीम मतदारसंघावर गेल्या निवडणुकीत मनसेने सेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी शिवसेनेने माजी आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे, तर मनसेकडून नितीन सरदेसाई यांना उमेदवारी ंिमळाली आहे. आघाडी, युती बिघडली असली तरी या मतदारसंघात मनसे आणि शिवसेना या कट्टर विरोधकांमध्येच खरी लढत होणार आहे. मतदारसंघामध्ये मनसेबद्दल असलेली नाराजी मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली आहे. यातून धडा घेत मनसे उमेदवाराने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. मात्र मतदारांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने मनसेच्या गोटात धाकधूक वाढली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपाचे अधिक वर्चस्व नसल्याने काँग्रेस आणि शिवसेनेला आघाडी, युती तुटल्याचा फटका बसण्याची शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेना पहिल्या क्रमांकावर, काँग्रेस दुसऱ्या आणि मनसे तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती. काँग्रेसकडून प्रवीण नाईक यांना उमेदवारी मिळाल्याचे समजते. त्यामुळे येथील लढत ही तिरंगी होणार असून, मनसेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे.

चांदिवली
विकासकामांचा मुद्दा महत्त्वाचा

चांदिवली विधानसभा मतदारसंघात नसीम खान विद्यमान आमदार आहेत. चांदिवलीत केलेली विकासकामे हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे, तर मनसेकडून ईश्वर तायडे हे रिंगणात आहेत. नवा चेहरा आणि नगरसेवक म्हणून केलेली कामे ही त्यांच्या जमेची बाजू आहे. या मतदारसंघावर उत्तर भारतीय, मुस्लीम आणि दलित मतदारांचा प्रभाव आहे. शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार हे हिंदी भाषिक असण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे उत्तर भारतीय मतांची विभागणी कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक शरद पवार राष्ट्रवादीकडून रिंगणात असण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून हरीश शुक्ला, प्रकाश शुक्ला यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपाकडून सीताराम तिवारी यांना उमेदवारी मिळाली आहे. यातील कोणाला तिकीट मिळेल, यावर समीकरणे अवलंबून आहेत. मात्र मुख्य लढत नसीम खान आणि ईश्वर तायडे यांच्यातच होईल. २००९मध्ये नसीम खान यांनी मनसेला ३३ हजार ७१५ मतांनी पराभूत केले होते. लोकसभेत चांदिवलीतून भाजपाला आघाडी मिळाली होती. त्या निवडणूकीप्रमाणेच भाजपाला परिस्थिती अनुकुल असेल की ती बदलण्यात काँग्रेस यशस्वी होते का, हे प्रचारावर ठरेल.

कुर्ला
राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान

कुर्ला मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पण यंदा काँग्रेस त्यांच्याविरुद्ध उभी ठाकण्याची शक्यता आहे. मुस्लीम, दलित मतदारबहुल मतदारसंघ असल्याने तसेच एससी राखीव असल्याने येथील समीकरणे या मतदारांभोवतीच फिरणार आहेत. मिलिंद (अण्णा) कांबळे हे येथील विद्यमान आमदार आहेत. मतदारसंघात केलेली कामे ते मतदारांसमोर घेऊन जातील. तर मनसेने स्नेहल जाधव यांच्या रूपात नवा चेहरा देण्याचा प्रयत्न येथे केला आहे. शिवसेनेकडून मंगेश कुडाळकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीतून भाजपामध्ये दाखल झालेले विजय कांबळे हे मिलिंद कांबळे यांना आव्हान देणार आहेत. कामगार क्षेत्रातील काम त्यांना उपयोगी ठरू शकते. मिलिंद कांबळे विकासकामांचा दावा करीत असले तरी मतदारसंघात आजही अनेक समस्या आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ राखणे राष्ट्रवादीसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. २००९ मध्ये मिलिंद कांबळे यांनी शिवसेनेला ६ हजार ९७१ मतांनी पराभूत केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाला कुर्ला मतदारसंघातून आघाडी मिळाली होती. ही आघाडी याही वेळी कायम राहील काय, याबाबत येथे कमालीची उत्सुकता आहे.

दिंडोशी
दिंडोशी मतदारसंघात अटीतटीचा सामना

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दिंडोशी मतदारसंघ २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसे फॅक्टरमुळे निसटला़ याचा फायदा थेट काँग्रेसला मिळून राजहंस सिंह आमदार झाले़ माजी महापौर सुनील प्रभू यांना शिवसेनेने पुन्हा एकदा येथून उमेदवारी दिली आहे़ या वेळेस मनसेचा प्रभाव नसला तरी भाजपाने उमेदवार उभा केल्यामुळे सेना धास्तावली आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही काँग्रेसच्या विरोधात आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला आहे़ काँग्रेसचे राजहंस सिंह, राष्ट्रवादीतून अजित रावराणे, मनसेतून शालिनी ठाकरे, शिवसेनेचे सुनील प्रभू आणि भाजपातून मोहित कंबोज अशी ही अटीतटीची लढत होणार आहे़ भाजपाने दिलेला उमेदवार स्थानिक नसल्याचा फायदा शिवसेनेला मिळेल़ काँग्रेसची पारंपरिक मते या मतदारसंघात आहेत़ मात्र रावराणे स्थानिक माजी नगरसेवक व त्यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका असल्यामुळे काँग्रेसला धोका संभवतो़ आघाडी — राष्ट्रवादी तसेच शिवसेना — भाजप हे एकमेकांची किती मते कापतात यावर या मतदारसंघातील निकाल अवलंबून असेल. एकूणच या ठिकाणी चौरंगी लढत चुरशीची असेल.

गोरेगाव
गोरेगावचा गड सेनेसाठी प्रतिष्ठेचा ठरणार

शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते सुभाष देसाई यांनी गोरेगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे़ एकेकाळचा समाजवाद्यांचा बालेकिल्ला कालांतराने सेनेच्या ताब्यात गेला. या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपाचे नगरसेवक अधिक असल्याचा फायदा देसाई यांना आतापर्यंत मिळत आला आहे़ दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हा बालेकिल्ला राखण्यासाठी मेहनत घेत होते़ मात्र युती तुटल्यामुळे गोरेगावमधील चित्र पालटले आहे़ आतापर्यंत शिवसेनेतून देसाई आणि राष्ट्रवादीतून शशांक राव यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत़ काँग्रेसमध्ये या जागेसाठी दावेदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे़ माजी खासदार गुरुदास कामत यांचा भाचा व माजी नगरसेवक समीर देसाई तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहे़ मात्र माजी नगरसेवक पिल्ले यांची मुलगी श्रीकला पिल्लेही या स्पर्धेत असल्याचे समजते़ भाजपाचे अनेक उमेदवार येथून उत्सुक आहेत. त्यात कोणाला तिकीट मिळते, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. तगडा उमेदवार भाजपाने उभा केल्यास शिवसेनेला बरीच झुंज द्यावी लागेल. उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने भाजपातूनही उमेदवार येण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या मतदारसंघातील लढत शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे़.

विलेपार्ले
काँग्रेसच्या आशा पल्लवित

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार एकट्या विलेपार्लेत ७१ हजार मतांनी पिछाडीवर राहिले. मोदी लाटेत अडचणीत आलेल्या काँग्रेसच्या या मतदारसंघाने महायुतीतील फाटाफुटीमुळे मात्र सुटकेचा निश्वास टाकला आहे. २००९ साली शिवसेना आणि मनसेच्या लढ्यात काँग्रेसचे कृष्णा हेगडे येथून अवघ्या सतराशे मतांनी निवडून आले. प्रिया दत्त यांच्याशी जवळीक असणा-या हेगडेंनी स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करतानाच पाकिस्तानी तुरुंगात खितपत पडलेल्या भावेश परमारला सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. यंदा इथे चौरंगी लढतीची शक्यता असल्याने हेगडे यांना संधी निर्माण झाली आहे. एकीकडे काँग्रेसचा परंपरागत मतदार त्यांच्या मागे राहणार, तर शिवसेना, मनसे व भाजपात विरोधी मतांची विभागणी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेकडून शशिकांत पाटकर, मनसेकडून सुहास शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक भाजपा नेते पराग अळवणींसाठी महायुती असतानाच भाजपाने ही जागा मागितली. जनसंपर्क आणि प्रतिमेच्या जोरावर अळवणी मोठ्या प्रमाणावर युतीची मते खेचू शकतात. विरोधी मतांतील फाटाफुटीचा पुन्हा एकदा कृष्णा हेगडे लाभ उठवतील का, याबद्दल उत्सुकता आहे.

शिवडी
सामना रंगणार मनसे-सेना-काँग्रेसमध्ये

शिवडी विधानसभा मतदारसंघातील लढत सर्वांत चुरशीची होणार आहे. २००९ साली मनसेतील बाळा नांदगावकर व शिवसेनेचे दगडू सकपाळ यांच्यात थेट लढत झाली होती. त्या वेळी ६४ हजार ३७५ मते मिळवून नांदगावकरांनी विजय मिळविला होता, तर दगडू सकपाळ यांना ५७ हजार ९१२ मते पडली होती. लोकसभा निवडणुकीतही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का देणाऱ्या नांदगावकर यांचा शिवसेनेने मोठा धसका घेतला आहे. या विधानसभा निवडणुकीत सेनेकडून विभागप्रमुख अजय चौधरी यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी मिळणार नसेल तर मध्यंतरी चौधरी राजीनामा देण्याच्या तयारीत होते. सेनेतील नाराजी व स्मिता चौधरी या काँग्रेसच्या कमकुवत उमेदवार या दोन्ही गोष्टी मनसेच्या पथ्यावर पडणार आहेत. मात्र काँग्रेसकडून उमेदवारी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक मनोज जामसुतकरही ‘फिल्डिंग’ लावत आहेत. या मतदारसंघात मनसे-सेना-काँग्रेस ही लढत होणार असून, येथील मनसेमध्ये गोंधळाची स्थिती आहे. भाजपाकडून शलाखा साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे अतुल कुरणकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चंद्रकांत देसाई यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

कुलाबा
कुलाब्यात चौरंगी मुकाबला

महायुतीत फूट पडल्याने दक्षिण मुंबईच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात आता चौरंगी लढत रंगणार आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार अ‍ॅनी शेखर यांना या ठिकाणी पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. शेखर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने गेल्या काही वर्षांपासून त्या सक्रीय नाहीत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊ नये, असे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे काँग्रेसविरोधी नाराजी आणि अंतर्गत बंडाळीमुळे शेखर यांना ही निवडणूक जड जाणार आहे. याउलट भाजपातर्फे राज पुरोहित यांना सोपी मानली जाणारी ही लढत शिवसेनेच्या पांडुरंग सपकाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अडचणीची झाली आहे. शिवसेनेची इथे फारशी मते नसली तरी ती भाजपाचे भवितव्य ठरवू शकतात. आजवर भाजपाने येथे आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र यावेळी भाजपाला लढत सोपी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अरविंद गावडे यांना या ठिकाणी पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र सध्याची मनसेची अवस्था पाहून या ठिकाणी मनसेचा विजय अशक्य मानला जात आहे. याउलट काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पाहता शिवसेना आणि भाजपाचे पारडे या ठिकाणी अधिक जड मानले जात आहे.

मुंबादेवी

काँग्रेसला मनसे, भाजपाची कांटे की टक्कर

मुंबादेवीतील काँग्रेसचे विद्यमान आमदार अमिन पटेल यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इम्तियाज अनिस आणि भारतीय जनता पार्टीचे अतुल शहा यांचे कडवे आव्हान आहे. शिवसेनेचे पांडुरंग सपकाळ यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात होती. मात्र महायुती तुटल्यानंतर सपकाळ यांचे उमेदवारी क्षेत्रच बदलण्यात आले. आता सपकाळ यांनी कुलाब्यातून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शनिवारी शेवटच्या दिवशी या ठिकाणी शिवसेनेतून कोणाला उमेदवारी मिळेल, याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. शुक्रवारी भाजपाचे अतुल शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर मनसेचे इम्तियाज अनिस शनिवारी येथून अर्ज दाखल करतील. याउलट मुस्लीमबहुल परिसर असलेल्या मुंबादेवीत पटेल यांचे वर्चस्व मानले जात आहे. मराठी मतांचे विभाजन झाले नाही तर मनसे या ठिकाणी मुसंडी मारण्याची शक्यता आहे. शिवाय शहा यांचे मुस्लीम मतदारांसोबत चांगले संबंध असल्याने पटेल यांना ही निवडणूक सोपी नाही. या मतदारसंघात प्रामुख्याने व्यापारीवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या वर्गावर कोणत्या पक्षाचा प्रभाव असेल, त्यावर निकाल अवलंबून असेल.


चारकोप
‘महाफुटी’मुळे संभ्रमावस्था

मराठी व गुजराती भाषिकांचे प्राबल्य असलेल्या चारकोप मतदारसंघावर सुरुवातीपासूनच युतीचे वर्चस्व राहिले आहे. मात्र नुकत्याच झालेल्या ‘महाफुटी’मुळे या मतदारसंघातील नागरिकांचा कौल कोणाला पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भाजपाचे उमेदवार व विद्यमान आमदार योगेश सागर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. भाजपाचा पारंपरिक मतदारांसोबतच अल्पसंख्यांकबहुल बस्त्यांमध्येही सागर यांनी जनसंपर्क कार्यालये थाटली. त्या माध्यमातून या वर्गापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुख्य लढत ही काँग्रेसचे उमेदवार भरत पारेख यांच्याविरुद्धच असेल. सत्तेत नसताना भरत पारेख यांनी मतदारसंघात अनेक कामे केलेली आहेत. शिवाय हे दोन्ही उमेदवार गुजराती समाजाचे असल्याने गुजराती मतांचे विभाजन येथे निर्णायक ठरू शकते. मराठी मतांचेदेखील मनसे-शिवसेनेत विभाजन होणार असल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवारास फायदा होण्याचीही चिन्हे आहेत. शिवसेनेकडून शुभदा गुडेकर यांचे नाव चर्चेत आहे, तर मनसेतर्फे दीपक देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीकडून अजूनही उमेदवाराचे नाव पक्के न झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

मालाड प.
प्रचारावरदेखील गणित अवलंबून

मालाड पश्चिम मतदारसंघावर काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांनी गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत चांगली छाप पाडली आहे. मात्र सध्याच्या ‘एकला चलो रे’ स्थितीमुळे यंदा कोणाच्या बाजूने कौल लागतो याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीकडून सुनील शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये मोठी चुरस असेल. भाजपाचे उमेदवार रामनारायण बरोट यांचादेखील येथे प्रभाव आहे. शिवसेनेशी घेतलेल्या फारकतीमुळे बरोट यांना शिवसेनेच्या उमेदवाराशीही दोन हात करावे लागणार आहेत. मनसेचे बहुचर्चित उमेदवार दीपक पवार यांचेदेखील कडवे आव्हान सर्वच पक्षांसमोर असेल. या मतदारसंघात मराठी, ख्रिश्चन, मुसलमान आणि गुजराती समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात असल्याने केवळ एका वर्गावर लक्ष देणे प्रत्येकाला धोक्याचे ठरू शकेल. विद्यमान आमदारांना मुस्लीम मतदारांसह अन्य भाषिकांसोबत असलेला संपर्क फायदेशीर ठरू शकेल. मराठी मतांचे विभाजन सेना-मनसे आणि भाजपासाठी डोकेदुखी ठरेल. तरी कमी वेळेत करण्यात येणाऱ्या प्रचारावरदेखील गणित बदलू शकेल. एकंदरीत या मतदारसंघातदेखील सर्व काही जर-तरच्या फॉर्म्युल्यावर आधारित आहे.


बोरिवली
मत विभागणीने अनपेक्षित निकाल लागणार

आघाडी व महायुती जरी दुभंगली असली तरी त्याचा फारसा परिणाम बोरीवली मतदारसंघात जाणवणार नाही. गेली कित्येक वर्षे बोरीवली विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. भाजपातर्फे आज विनोद तावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेकडून या मतदारसंघाकरिता माजी नगरसेवक दामोदर म्हात्रे यांचे नाव पुढे येत आहे. मनसेकडून नयन कदम यांंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे, तर काँग्रेसकडून अशोक सुत्राळे हे निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीकडून अद्याप कोणाचेही नाव पुढे आलेले नाही. बोरीवली विधानसभा मतदारसंघात मराठी व गुजराती भाषिक वर्गाचे प्राबल्य आहे. २००९ साली बोरीवली मतदारसंघातून भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी २० हजार मतांनी विजय मिळवून मनसेच्या नयन कदम यांचा पराभव केला होता. शेट्टी खासदार बनल्याने त्यांच्या जागी तावडे निवडणूक लढवित आहेत. सुरक्षित मतदारसंघात इतका तगडा उमेदवार दिल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त होत आहे. त्यातच, पाच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये होणारी मतांची विभागणी अनपेक्षित निकाल लावणार का, याकडे सगळ््यांचे लक्ष आहे.

दहिसर
घोसाळकर विरोधाकडे लक्ष

दहिसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड म्हणून परिचित आहे. या मतदारसंघातून शिवसेनेतून विनोद घोसाळकर व काँग्रेसतर्फे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला. मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा म्हात्रे आक्रमक आणि धडाडीच्या म्हणून ओळखल्या जातात. या मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे नगरसेविका मनीषा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेना नगरसेविका व माजी महापौर शुभा राऊळ देखील घोसाळकर विरोधात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. अपक्ष म्हणून लढण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. मात्र, येनवेळी मनसेने त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मनसेकडून राजेश येरुणकर यांचेही नाव चर्चेत आहे. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, ख्रिस्ती भाषिकांचे प्राबल्य आहे. २००९ साली या मतदारसंघातून मनसेच्या संजना घाडी यांचा पराभव करून शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांनी दहीसर मतदारसंघावर विजय मिळविला होता. मात्र, शिवसेनेच्याच नगरसेविकांशी गैवर्तुवणूकीच्या मुद्यावर त्यांची प्रतिमा मलिन झाल्याचे चित्र आहे. राऊळ, म्हात्रे आदींनी कोणत्याही परिस्थितीत घोसाळकर विरोध कायम राहणार असल्याचे सांगितले.

कलिना
मोदी लाट राहिल्यास भाजपाला फायदा

कलिना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून कृपाशंकर सिंह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसेने चंद्रकांत मोरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी अद्यापही येथील उमेदवाराचे नाव घोषित केले नसले तरी शिवसेनेकडून संभाव्य उमेदवार म्हणून संजय पोतनीस यांचे नाव चर्चेत आहे. भाजपाकडून अमरजित सिंह यांचे नाव निश्चित झाले आहे. मनसेचे कप्तान मलिक यांना कुर्ला विधानसभेतून उमेदवारी मिळण्याची चिन्हे होती; ती त्यांना मिळाली नाही. यावर कप्तान मलिका यांचे नाव राष्ट्रवादीकडून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यामुळे कलिना विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांना ५१ हजार २०५ मते मिळाली होती. मनसेचे चंद्रकांत मोरे यांना ३८ हजार २८४ मते मिळाली होती. तर नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून भाजपाने आघाडी घेतली होती. कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या अधिक असून, ही मते काँग्रेसकडे एकवटलेली आहेत. मोदी लाट कायम राहिल्यास भाजपा अधिक मते खेचेल. येथील समीकरणे पाहता काँग्रेसचा पत्ता चालण्याची शक्यता आहे.

वडाळा
सेना-मनसेमुळे काँग्रेसला फायदा

आघाडी व युती तुटली असली तरी वडाळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या तोडीचा उमेदवार अन्य कोणत्याही पक्षाकडे नसल्याने काँग्रेसचा येथील बालेकिल्ला राखण्यात कोळंबकर यांना यश मिळण्याची शक्यता आहे़ आघाडी तुटल्याने येथून राष्ट्रवादीकडून जितू म्हात्रे यांचे नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून हेमंत डोके, तृष्णा विश्वासराव आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव चर्चेत आहे. भाजपला सध्यातरी उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागत आहे. अवघ्या काही तासांत भाजप कोणाला उभे करणार याची उत्सुकता आहे. मनसेकडून आनंद प्रभू रिंगणात असल्याने येथील लढत चुरशीची आहे. राणे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कोळंबकर दांडग्या जनसंपर्कासाठी ओळखले जातात. व्यक्तिश: कोळंबकर यांच्याबाबत नाराजी नसली तरी आघाडी सरकारला बीडीडी चाळींचे पुर्नवसन, पोलिस वसाहतीचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले. याचा फटका कोळंबकरांना बसू शकतो. त्यातच लोकसभा निवडणुकीदरम्यान उफाळलेली अंतर्गत गटबाजीला अद्याप शमण्याची चिन्हे नाहीत. आघाडी, महायुती फुटल्याने होणारे मतविभाजन निर्णायक ठरू शकते.

Web Title: NCP's 131, BJP 172 candidates declared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.